🕒 1 min read
गुवाहाटी : महाराष्ट्रात राजकीय संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षात नव्या राजकीय शैलीही पाहायला मिळत आहेत. बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच गुवाहाटी येथील हॉटेलमधून बाहेर पडून माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आम्ही जे 50 लोक आलो आहोत ते त्यांच्या स्वेच्छेने आले आहेत आणि ते आनंदी आहेत.” यापूर्वी, शिवसेना खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांपैकी काही आमदार संपर्कात असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र गुवाहाटीत असलेले आमदार यात तथ्य नसल्याचे सांगत आहेत. आमदार योगेश रामदास कदम यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.
“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची मोहीम हाती घेतली आहे. याला पाठिंबा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत. रामदास भाईंचा शिवसेना वाढवायला सिंहाचा वाटा आहे. माझ्या दापोली मतदारसंघात शिवसेना पालकमंत्री माझी गळचेपी करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडलेल्या आमदाराला निधी देत होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तटकरे यांना जिल्हा नियोजन मधून निधी देत होते. यासाठी मी हा निर्णय घेतला आहे,” असे योगेश कदम यांनी म्हटले आहे.
बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंचे शेवटचे भावनिक आवाहन
राज्यात येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पोस्ट करत कळकळीची विनंती केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे. आपण या माझ्या समोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका.”
“शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू,” अशी पोस्ट उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
