मुंबई : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप नेते शिवसेनेवर जोरदार टीका करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील नामांतराला विरोध केला आहे. त्यामुळे, संभाजीनगर व्हावे अशी मागणी करणाऱ्या व राज्यासह औरंगाबाद महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची मात्र मोठी कोंडी झाली आहे.
या मुद्द्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. अशातच, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेवर प्रहार केला आहे. ‘नामांतराचा विषय म्हणजे सेनेचे नाटक आहे, सेना फक्त प्रस्ताव पाठवते भूमिका काय घेत नाही. शिवसेना म्हणजे नौटंकी सेना आहे. निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस हे सर्व ठरवून करतंय,’ असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
तर, ‘शिवसेनेनं आता औरंगाबादचं संभाजी नगर करा, असं म्हणायचं. म्हणजे त्यांना वाटतं त्यांचे मतदार खूश होतील. काँग्रेसनं ते करू नका असे म्हणायचे, म्हणजे त्यांना वाटतं त्यांचे मतदार खूश होती. निवडणुका आल्यामुळे नूराकुस्ती आता सुरू झाली आहे. औरंगाबाद विमानतळाच्या मुद्द्यावरुन ते म्हणाले की, आज इतके वर्ष सत्तेत असूनही त्यांना काही करता आलेले नाही, हे नुसते पत्र पाठवतात,’ असा टोला देखील फडणवीसांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कौतुक तर होणारचं ! आजारी असलेल्या माजी कर्मचाऱ्याची भेट घेण्यासाठी टाटांनी थेट गाठलं पुणे
- संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणाऱ्या थोरातांच्या घरी मनसे पाठवणार 10,000 पोस्टकार्ड
- अखेर प्रतीक्षा संपली, कोरोना लसीकरणाचा मुहूर्त ठरला !
- सीरम विरुद्ध भारत बायोटेक : अखेर कोरोना लस उत्पादक कंपन्यांमधील वादावर पडदा
- संजय राऊत भाजपला सुरुंग लावण्याच्या तयारीत; राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा


