नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आलेली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.
कोवॅक्सिन ही लस पूर्णपणे स्वदेशी आहे. मात्र, या लशींवरून राजकारण देखील सुरु झाल्याची खंत भारत बायोटेकचे चेअरमन आणि एमडी डॉ. कृष्णा एल्ला यांनी व्यक्त केली होती. या दोन्ही लशींना परवानगी मिळाल्यानंतर स्वदेशी विरुद्ध विदेशी असा रंग देण्यात येत असल्याचे दिसून आले होते. या दोन्ही कंपन्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप देखील सुरु झाले होते.
याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला आणि भारत बायोटेकचे एमडी डॉ. कृष्णा एल्ला यांनी आपापल्या कंपनीच्या वतीनं एकत्रितरित्या पत्रक जारी केलं आहे. या पत्रकाद्वारे वादावर पडदा टाकत रुग्णांचा जीव वाचवणं महत्वाचं असल्याचं म्हणत या दोन्ही कंपन्यांनी वाद मिटवला आहे. ‘लोक आणि देशांसाठी लस किती महत्त्वाची आहे याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही जगाला आमची कोरोना लस देण्यासाठी एकत्रित प्रतिज्ञा घेतली आहे.’ असं या पत्रकाद्वारे सांगण्यात आलं आहे.
‘भारत आणि जगातील जास्तीत जास्त जीव वाचवणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. यासाठी लस गरजेची आहे. भारतात आता दोन कोरोना लशींच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. या लशींचं उत्पादन, पुरवठा आणि वितरणावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. ज्यामुळे जास्तत जास्त लोकांना सुरक्षित आणि प्रभावी लस मिळेल. आमच्या दोन्ही कंपनी हेच करत आहेत. कोणत्याही अडचणीशिवाय देश आणि जगाला लशीचा पुरवठा करणं ही आमची ड्युटी आहे. आमच्या दोन्ही कंपन्या लशीवर ठरलेल्या योजनेनुसारच काम करत आहेत. त्यामुळे आम्ही जगाला आमची कोरोना लस देण्यासाठी एकत्रित प्रतिज्ञा घेतली आहे.’ असं या कंपन्यांनी एकत्रितपणे पत्रक जाहीर केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- बर्ड फ्लूचं संकट : ‘या’ राज्याने केली राज्यस्तरीय आपत्तीची घोषणा
- शिवसेनेची ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ ही भूमिका स्वागतार्ह : चव्हाण
- ममता बॅनर्जींची डोकेदुखी वाढली; लक्ष्मी रतन शुक्ला यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा
- लवकरात लवकर मेगाभरती घ्या नाहीतर मेगा आंदोलन करू; ओबीसी समाज आक्रमक
- संजय राऊत भाजपला सुरुंग लावण्याच्या तयारीत; राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा


