अहमदनगर : ‘मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी,’ असं विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहिले. यासोबतच, येणारा काळच काय ते ठरवेल, असं सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यामुळे भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर, मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी दानवे पुढाकार घेणार असतील तर राज्य सरकार त्यांच्या पाठीशी राहिल असं आश्वासन देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलंय.
दरम्यान, यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केलं आहे. ‘भाजपचे शिवसेनेसोबतचे वर्तन पाहता भविष्यात अनेक वर्षे ते एकत्र येण्याचे संकेत नाही. ज्या पद्धतीने शिवसेनेला डिवचण्याचं काम सुरू आहे, त्यावरुन तरी असे दिसत नाही. मात्र, मुख्यमंत्री देखील चांगलं काम करत आहेत. त्यामुळे ते राजकिय शिष्टाचार म्हणून बोलले असतील. मात्र, वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही,’ असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.
यासोबतच, ‘महाविकास आघाडी सरकार पुढची पंचवीस वर्षे टिकणार आहे आणि त्यामुळे नैराश्याने भाजपचे नेते सरकारवर वारंवार टीका करत आहेत,’ असा टोला देखील मिटकरी यांनी भाजप नेत्यांना लगावला. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघात आमदार निलेश लंके यांच्या विकासनिधीतून सुरू करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मिटकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले, यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ज्यांना कुणाला आमच्यासोबत यायचंय त्यांनी खुशाल यावे आणि भावी व्हावे-संजय राऊत
- ‘पुढचे तीन वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहणार असतील तर भाजपसोबत जाण्यास तयार’
- पुन्हा बरसणार : राज्यात ‘या’ दिवसापासून गडगडाटासह जोरदार पाऊस; हवामान खात्याची माहिती
- राज्यपालांनी महिलेचा मास्क काढल्याने वाद; अजितदादा म्हणाले, ‘राज्यपाल महामहिम, त्यांच्याबाबत…’
- उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी वर्षा गायकवाड यांच्यावर काँग्रेसने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी


