नागपूर : महाराष्ट्रातील एका आठवड्याहून अधिक काळ राजकीय नाट्यानंतर पाच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मंगळवारी पहिल्यांदाच नागपुरात पोहोचले. शहरात पोहोचल्यावर स्थानिक भाजप नेत्यांसह शहरवासीयांनी त्यांच्या नेत्याचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर प्रेस क्लबतर्फे आयोजित ‘मिट द प्रेस’ कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठे विधान केले आहे.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ठामपणे उभी राहणारी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. पारिवारिक वारसा हा उद्धव ठाकरे यांच्याकडे असला तरी वैचारिक वारसा सुद्धा महत्त्वाचा असतो. हा वैचारिक वारसा घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात आहेत,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मीच दिला होता. मी सरकारमध्ये नसेन, असेही ठरले होते. मात्र, केंद्रीय नेतृत्त्वाने आग्रह धरल्याने मी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.”
शिवसेनेत एक उठाव झाला-
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शेतकर्यांचे, विकासाचे अनेक प्रकल्प थांबले होते. महाविकास आघाडीतील अंतर्विरोध दररोज दिसत होता. शिवसेनेसमोरचे प्रश्न तर मोठे होते. त्यांच्या आमदारांमध्ये मोठी नाराजी होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेतल्याने अस्वस्थता अधिक होती. यातून शिवसेनेत एक उठाव झाला. ते बंड नाही. त्यातून ते आमच्यासोबत आले आणि आम्ही त्यांना मदत केली. आम्ही म्हटले असते, तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळाले असते. पण, पदाची लालसा आम्हाला नव्हती. उलट शिवसेनेचाच मुख्यमंत्री करु, हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता.”
पंतप्रधानांनी काँग्रेसला पाणी पाजले-
देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर देखील टीका केली. “काँग्रेसने मोदीजींना चायवाला म्हणून हिणवले, त्याच आमच्या पंतप्रधानांनी आज काँग्रेसला पाणी पाजले आहे. त्यामुळे कुणी आम्हाला रिक्षावाले म्हणून हिणवत असेल तर आम्हाला त्याचा आनंदच आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले नाही. तर सामान्य माणूसच राज्य करेल,” असे फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

