मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा राजकीय सत्तासंघर्ष सुरु होता. या सत्तासंघर्षात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. राज्यात नवं शिंदे सरकार स्थापन झालं. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी स्वपक्षाविरोधातच बंड पुकारलं होत. यानंतर शिवसेनेला अजूनही धक्क्यांवर धक्के बसत आहेत. मात्र एवढं सगळं घडून आम्ही आजून शिवसेनेतच आहोत असं शिंदे वारंवार सांगत आहेत.
मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांसोबत सोमवारी रात्री हुतात्मा स्मारक, चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. त्याबरोबरच ठाण्यामध्ये आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धिविनायक मंदिरात आरती केली.
मात्र यावेळी सिद्धिविनायक मंदिराच्या समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर गैरहजर होते. यामुळे अनेक शंका उपस्थित केेल्या जात आहेत. मंदिरात आरती सुरु असताना मंदिर समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर हे शिवसेना भवनात बैठकीसाठी उपस्थित होते.आदेश बांदेकर यांनी याचं कारण स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री आरतीसाठी येणारं असल्याची कोणतीही कल्पना आदेश बांदेकर यांना दिली नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पक्षाच्या पूर्वनियोजित बैठका असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान , पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले आहे. समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली तसेच त्यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन सत्कार केला आहे.
महत्वाच्या बातम्या :


