अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- पारनेर नगरपंचायतीचा कार्यकाल २५ नोव्हेंबर २०२० रोजी संपला असून नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पारनेर नगरपंचायतसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार असून यासाठी सर्व शिवसैनिक व पदाधिकारी रात्रंदिवस कष्ट करून विरोधकांवर मात करतील असा विश्वास संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी व्यक्त केला. आगामी नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथील आंबेडकर भवन येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
भाऊ कोरगावकर पुढे म्हणाले की, विजयराव औटी यांचा दबदबा आजही कायम असून मतदार संघातील गुंडगिरी शिवसेना स्टाईलने मोडीत काढणार असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीवर टोला मारला. तर दुसरीकडे विकासकामांसाठी पारनेर नगरपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी दिला असून या निवडणुकीत या मुद्द्यावर ही निवडणूक जिंकणार असल्याचा आशावाद विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणण्याची घोषणा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केली आहे. पारनेर शहर हे माजी आमदार औटी यांचे गाव असल्याने नगरपंचायत ताब्यात घेऊन आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी माजी आमदार विजयराव औटी हे देखील कसोशीने प्रयत्न करणार आहेत. तर भाजपाचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी देखील नगरपंचायत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे प्रत्येक प्रभागात सर्व पक्षीयांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली असून उद्योजक चंद्रकांत चेडे व अर्जुन भालेकर तिसरा आघाडीचा पर्याय अजमावणार आहेत.
यावेळी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी, जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सदस्य डॉ.श्रीकांत पठारे, युवा सेना तालुका प्रमुख नितीन शेळके, नगरसेवक दत्तात्रय कुलट, शहराध्यक्ष निलेश खोडदे, शंकर नगरे उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचा एल्गार; मुंबईत आक्रमक निदर्शने
- फेसबुक युझेर्स साठी महत्वाची बातमी: ‘या’ कारणामुळे फेसबुकला विकावं लागणार व्हाट्सअप आणि इन्स्टाग्राम देखील…
- विराटच्या ‘पॅटरनिटी’ लीव्हला स्टिव्ह स्मिथचा पाठींबा
- शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या रावसाहेब दानवेंची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : राष्ट्रवादी
- नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचा साक्षीदार असेल : नरेंद्र मोदी


