🕒 1 min read
मुंबई- पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शर्जिल उस्मानी याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता तो गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी शर्जिलने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत आपल्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यापासून पोलिसांना मज्जाव करावा, अशी मागणीही त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे.
पुण्यात 30 जानेवारीला एल्गार परिषद झाली होती.या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली होती.शरजील उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केली होती. यावेळी भाषण करताना शर्जिलने हिंदू धर्म, न्यायव्यवस्था आणि संसदेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
आपल्या वक्तव्यानंतर कोणत्याही प्रकारची हिंसा झाली नाही किंवा सामाजिक सलोखा बिघडला नाही. त्यामुळे आपल्याविरोधात गुन्हा हा आधारहीन आहे, असा दावा त्याने याचिकेत केला आहे. आपण भाषणात कोणताही धर्म, जात किंवा समुदायाबाबत द्वेषभावना न ठेवता प्रत्येकाने समाजात निर्माण झालेल्या वाईट इच्छाशक्तीविरोधात लढण्याचे आवाहन केले होते, असेही शर्जिलने याचिकेत म्हटले आहे.
याप्रकरणी प्रदीप गावडे यांनी तक्रार केल्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी स्वारगेट पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.शरजील उस्मानी वर १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला असून यांसदर्भात पुणे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी शर्जिलने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शरजील उस्मानी यानं हिंदुविरोधी केलेल्या वक्तव्यांनंतर भाजपनं त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे सरकारची या प्रकरणी चांगलीच नाचक्की झाली असल्याचे चित्र आहे.
कोण आहे शर्जील उस्मानी ?
एल्गार परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आलेला 24 वर्षीय शरजील उस्मानी हा अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी नेता आहे. सीएए आणि एनआरसी या कायद्यांविरोधात केलेल्या आंदोलनासाठी तो ओळखला जातो. सीएए-एनआरसी या कायद्यांविरोधात केलेल्या आंदोलनाबाबत बोलण्यासाठी शरजीलला एल्गार परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं.
15 डिसेंबर 2019 रोजी अलिगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये सीएए-एनआरसी या कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावेळी झालेल्या संघर्षामध्ये त्याचा सहभाग असल्याच्या आरोपांवरून त्याला उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. सध्या तो जामीनावर बाहेर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरजील उस्मानीचे वडील डॉ. तारिक मोहम्मत उस्मानी हे AMU मध्ये M.Sc विभागात असोसिएच प्रोफेसर आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पालकमंत्री देसाई दोन दिवसात घेणार शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी बैठक
- मराठवाड्यात ऑक्सिजन टँक वाढवण्याच्या विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांच्या सूचना
- स्वॅब न देताच रुग्ण येत आहेत कोरोना पॉझिटिव्ह; बुलढाण्यातील अजब प्रकार समोर !
- टीसीच्या नोकरीचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणाचा तिघांना १६ लाखांचा गंडा
- औरंगाबादकरांनो काळजी घ्या! २४ तासांत ४५९ नव्या रुग्णांची नोंद; पाच जणांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
