🕒 1 min read
सातारा : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास कायद्यानुसार बंदी आहे. ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसेच पक्षांनी केली आहे. या मुद्द्याला घेऊन अनेक ठिकाणी आंदोलनदेखील करण्यात आले आहे. या अनुषंगाने तमिळनाडू, कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रातही बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी, अशी बैलगाडी मालकांची मागणी आहे. आम्ही शिष्टमंडळाच्या माध्यमातून पोलिस अधीक्षकांना भेटून बैलगाडी मालकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी करणार आहोत. येत्या दोन दिवसांत खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रतोद तथा विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते पुढे म्हणाले, पशुसंवर्धन मंत्र्यांसोबत बैठक घेण्याची विनंती करणार असून खेळ व स्पर्धेची नियमावली व निकषाच्या आधारे बैलगाडी शर्यतीला परवानगी द्यावी, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात जिल्ह्यात होणाऱ्या आंदोलनास आमचा पाठिंबा राहील, असे स्पष्ट मतही शिंदे यांनी व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर ७ मे २०१४ पासून बंदी घातली आहे. राज्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी बैलगाडी शर्यतीची परंपरा सुमारे ४०० वर्षांपासून जुनी आहे.
ग्रामीण भागात देव-देवतांच्या यात्रांमध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यती आयोजिण्याची परंपरा आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. त्याचा फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला होतो. तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांनी बैलगाडी शर्यतीबाबत स्वतंत्र कायदा केला आहे. याच धर्तीवर बैलगाडी शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.
‘बैलगाडा शर्यतीला शेतकरी येणार आहेत, तालिबानी नव्हे’
दरम्यान, बैलगाडा शर्यतीसाठी भाजप नेते गोपीचंद पडळकरसुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे या गावात दि. २० ऑगस्ट रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. शिवाय या शर्यतीत प्रथम येणाऱ्यास त्यांनी १ लाख ११ हजार रुपयांचे जाहीर केले आहे. मात्र, शर्यतीला बंदी असल्याने आजपासूनच या ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. यावर पडळकरांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. ‘गोवंशाची शान आणि शेतकऱ्यांची ओळख असणारी बैलगाडी नामशेष करण्याचे काम हे राष्ट्रवादीकडून होत आहे. राष्ट्रवादी बळाचा वापर करून बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी नाकाबंदी करून शेतकऱ्याचा विश्वासघात करणार आहेत. याठिकाणी शेतकरी येणार आहेत. अफगाणिस्तानहून कोणीही तालिबान येणार नाहीत,’ असे पडळकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परळीतील त्या अंगार, भंगारवाल्या घोषणा मी ऐकल्याच नाहीत’, मंत्री भागवत कराडांची प्रतिक्रिया
- मुंडे भगिनी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटोच गायब!
- नाराजी कायम! मंत्री भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेकडे मुंडे समर्थकांची पाठ
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, मनसेची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
