🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : महिलेचा हात पिरगळण्याच्या घटनेवरून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर चांगलेचं चर्चेत आले आहेत. महाडेश्वर यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी राज्यातील अनेक नेत्यांनी केली आहे. तर मनसेच्या सरचिटणीस शालिनी जितेंद्र ठाकरे यांनी ‘जनाची नाही किमान मनाची लाज बाळगून महापौरपदाचा राजीनामा द्या’ अशा आशयाचे पत्र लिहिले आहे.
या पत्रात शालिनी ठाकरे यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना काही सवाल विचारले आहेत. तर महिलांशी असे वर्तन करताना तुम्ही धजावलात कसे असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. ‘मुंबईच्या महापौरांचे प्रताप’ समजले आणि प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाची मान शरमेने खाली गेली, असे देखील खंत त्यांनी व्यक्त केली.
वाचा काय आहे पत्र
‘परवा सांताक्रूझ-वाकोला येथील पटेलनगरमध्ये माला नागम व संकेत नागम या मायलेकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानंतर तिथे जनक्षोभ उसळला आणि स्थानिक महिला-पुरुषांनी तुम्हाला दुर्दैवी कुटुंबाच्या घरी जाण्यापासून रोखलं. तिथल्या स्थानिक महिलांनी तर तुम्हाला गराडाच घातला. या महिलांमध्ये आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या कार्यकर्त्याही होत्याच. या सर्व महिलांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी, त्यांच्या संतप्त भावनांचा मान राखण्याऐवजी तुम्ही महिलांनाच उद्देशून ‘ए दादागिरी करू नकोस, तुला माहीत नाही मी कोण आहे’, असं वक्तव्य केलंत. इतकंच नव्हे तर, एका तरुणीचा हात पकडून तो मुरगळण्यापर्यंत तुमची मजल गेली. शेकडो लोकांच्या उपस्थितीत हे दुष्कृत्य करण्याचा माजोरडेपणा तुम्ही केलात. ही सर्व घटना व्हिडिओत कैद झाली आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून अवघ्या देशाला ‘मुंबईच्या महापौरांचे प्रताप’ समजले आणि प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाची मान शरमेने खाली गेली. या संपूर्ण घटनेनंतर ‘माझी राजकीय प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांचा मी निषेध करतो ‘असं मत तुम्ही व्यक्त केलं आहे. पण स्थानिक लोक आणि विशेषत: महिला तुमच्यावर का संतापल्या, हे जाणून घेणं तुम्हाला महत्वाचं वाटलं नाही.
स्वत:च्या नावापुढे ‘प्रिन्सिपल’ लावता, पण प्रिन्सिपलसारखं वागत नसाल तर काय फायदा? तुमच्यावर ३५४अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तुमच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे करणार आहोत. राज्य महिला आयोगाकडेही तुमच्याविरोधात साधार पुराव्यांसह दाद मागणार आहोत. मात्र, हे सारं करताना मुंबईच्या महापौरपदाची शान धुळीला मिळणार, याविषयी खेद वाटतोय. म्हणूनच ‘जनाची नाही तर मनाची लाज बाळगून’ तुम्ही तत्काळ महापौरपदाचा राजीनामा द्यावा आणि महापौरपदाचा उरला-सुरला मान जपावा, ही तुमच्याकडे ‘शेवटची मागणी’!
भारताने या आधीचं पाकिस्तानशी सगळे संबंध तोडायला हवे होते : संजय राऊत
मेरे प्यारे देशवासियों, संध्याकाळी आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार देशाला संबोधित
राष्ट्रवादीच्या ‘या’ दिग्गज नेत्याने केले शिवसेना प्रवेशाच्या वृत्ताचे खंडन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
