सिल्लोड : सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छता, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती बाबत अनियमितता आणि उपलब्ध आरोग्य सुविधा असतांनाही रुग्णांना औरंगाबाद येथे पाठवणे या कारणांवरून महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील वैदयकीय अधिक्षक आणि आरोग्य अधिकाऱ्यांना शुक्रवारी ( दि.९) चांगलेच फैलावर घेतले.
शुक्रवारी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. या भेटी दरम्यान राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रुग्णालयातील सर्व विभाग, मेडिकल स्टाफ, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी येथील अस्वच्छता, बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे, आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील अधिकाऱ्यांचा जोरदार समाचार घेतला.
सामान्यांना आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी सरकार विविध योजना राबवित आहेत. सरकारी रुग्णालये म्हणजे मंदिरापेक्षा कमी नाही असे स्पष्ट करीत यापुढे रुग्णालयातील अस्वच्छता व बेशिस्तपणा खपून घेणार नाही अशी तंबी देत कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर व सर्व सुविधा उपलब्ध असतांना खाजगी दवाखान्याचा रस्ता दाखविणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश राज्यमंत्री सत्तार यांनी दिले.
सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाला १०० खाटांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने याबाबत अावश्यक व अधिक आरोग्य सुविधा तसेच रिक्त व वाढीव जागा भरण्याच्या दृष्टीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी बोलत असताना सत्तार यांनी येथील शस्त्रक्रिया विभाग व सीसीटीव्ही यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करणे, कर्मचाऱ्यांच्या नियमित उपस्थितीसाठी बायोमेट्रिक मशीन बसविणे, गरजेनुसार पाचारण करण्यात येणाऱ्या खाजगी डॉक्टरांना नियमाप्रमाणे त्वरित मानधन अदा करणे अशा सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मला पुढील २५ वर्ष राजकारण करायचं आहे, म्हणून…’
- निलंबनामुळे परिणाम नाही, अधिक ताकदीने कामे करू: आमदार अभिमन्यू पवार
- तब्बल पंधरा दिवसापासुन पाऊसच नसल्याने खरीप हंगाम धोक्यात
- फिल्मसिटीचा कायापालट होणार; सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखांनी दिले निर्देश
- उभारी २.० अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा


