मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. देशभरात या लाटेचे गंभीर परिणाम परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.
देशातील विविध उच्च न्यायालयांसह सर्वोच्च न्यायालयाने देखील केंद्र सरकारला यावरून फटकारलं आहे. अशातच शेकडो मृतदेह पवित्र गंगानदीच्या प्रवाहातून वाहत येत असल्याने तेथील प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं असून आज शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या ‘रोखठोक’ सदरातून सध्याच्या एकूण परिस्थितीवर अत्यंत बोचरी टीका केली आहे.
‘कोरोना संकटात सरकारचे व्यवस्थापन पूर्ण कोसळले आहे. वाराणशीत गंगाकिनारी प्रेतांच्या चिता पेटत आहेत, पण प्रेते जाळायला जागाच उरली नाही म्हणून लोकांनी आप्तांचे मृतदेह गंगेत सोडले. गंगेच्या प्रवाहात सोडलेले शंभरावर मृतदेह पाटण्याच्या गंगाकिनारी मिळाले. अयोध्येत पंतप्रधानांच्या उपस्थितीत राममंदिराचे भूमिपूजन झाले, पण संपूर्ण अयोध्यानगरीत कोरोनाचा हाहाकार माजला असून अयोध्या ऑक्सिजनअभावी गुदमरत, तडफडत आहे. लोकांना इस्पितळे नाहीत. औषधे नाहीत. लस नाही. प्राणवायू नाही. फक्त श्रीरामाचा नारा आहे. त्याने फार तर राजकीय पक्षांना ऑक्सिजन मिळत राहील. त्या ऑक्सिजनवर यापुढे मनुष्य जगणार नाही. अयोध्येपासून वाराणसीपर्यंत, मक्केपासून मदिनेपर्यंत नुसता हाहाकार आहे. त्यावर टीका करायची नाही तर काय करायचे?’ असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राजीव सातव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला सायटोमॅजिलो व्हायरस म्हणजे काय?
- ‘एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला’, मुख्यमंत्री ठाकरेंच्या भावना
- ‘मी माझा संसदेतील मित्र गमावला’, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
- असाध्य ते साध्य! राजीव सातव यांचा हिंगोली ते दिल्ली राजकीय प्रवास
- ‘सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह मराठवाड्याचे मोठे नुकसान’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

