मुंबई: महाराष्ट्रात एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा ताबा घेतलाच आहे. न्यायपालिकांनी तरी आपल्यावर शिंतोडे उडू देऊ नयेत, पण काय करणार? मला न्याय हवा असेल तर मी न्यायालयात जाणार नाही, तेथे न्याय मिळत नाही, असे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीशांचीच ही अवस्था तर सामान्यांचे काय? विक्रांत युद्धनौकेच्या नावावर पैसे गोळा करून अपहार करणे हा देशद्रोह नाही काय? माय लॉर्ड. तुम्हीच सांगा! असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केला आहे.
‘विक्रांत वाचवा’च्या नावाखाली कोटय़वधी रुपये गोळा करून अपहार करणाऱ्या संशयित गुन्हेगारांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. पैसे गोळा करणाऱ्या माफिया टोळीचे सूत्रधार किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र हे गेल्या काही दिवसांपासून फरार होते. उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यावर ते प्रकट झाले. ज्यांच्यावर पैशांच्या अपहाराचे गुन्हे दाखल झाले व न्यायालयाने ज्यांना पोलीस स्टेशनात रोज हजेरी लावायला सांगितले असे सोमय्या हे महाविकास आघाडीचे म्हणे घोटाळे बाहेर काढणार आहेत. सोमय्या यांच्यावरच घोटाळय़ासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. ‘आयएनएस विक्रांत वाचवा’च्या नावाखाली त्यांनी मोठया प्रमाणात पैसे गोळा केले, हे पैसे राजभवनात जमा करू असे त्यांचे वचन होते. ती रक्कम मधल्यामध्ये गायब झाली. राजभवनाने तर पैसे जमा झालेच नाहीत असे लेखी सांगितले, पण आपले न्यायालय पैशांच्या अपहाराचा हा पुरावा आहे असे मानायला तयार नाही. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
स्वतः आरोपीचे वकील कबूल करतात की, पैसे गोळा केले ते राजभवनात जमा केलेच नाहीत. आरोपीने ते भाजपच्या कार्यालयात जमा केले. भाजप कार्यालयात विक्रांतचा निधी जमा केला व शेकडो लोकांची फसवणूक झाली हे मानायला आमचे न्यायालय तयार नसेल तर आपण कोणत्या युगातून जात आहोत, येणारा काळ किती कठीण आहे, हे लक्षात येईल. अशी खंतही संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
आरोपी सोमय्यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला तेव्हा न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवली. ती म्हणजे, ‘सोमय्या व त्यांच्या मुलाने बेकायदेशीरपणे पैसे गोळा केले. त्यांनी कोणत्याही कॉम्पिटंट ऍथॉरिटीची परवानगी घेतली नव्हती. हे कृत्य अप्रामाणिकपणाचे आहे. जनतेतून पैसे गोळा केले हे सकृतदर्शनी स्पष्टच दिसत आहे.’ हे जमा झालेले पैसे सोमय्या पिता-पुत्रांनी कोणालाही दिले नाहीत व जमा केलेल्या पेशांचा हिशेब ठेवला नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाने आरोपींना जामीन नाकारला. जामीन नाकारताच आरोपी बाप-बेटे फरार झाले. आता आपल्या विद्वान हायकोर्टान आरोपीला दिलासा देताना काय सांगितले ते पहा. तक्रार बऱ्याच वर्षांनी दाखल झाली. 2013 ते 2022 मध्ये तक्रार दाखल झाली नाही आणि घोटाळ्याचा 57 कोटींचा आकडा कुठून आणला? पुरावा काय? वृत्तपत्रातील बातम्यांवरून तक्रारदाराने गुन्हा दाखल केला. आदरणीय न्यायालयास साष्टांग दंडवत घालून विनम्रपणे सांगू इच्छितो की, माय लॉर्ड. 2013 साली पैसे गोळा केले. ते राजभवनात जमा झाले असे देणगीदारांना वाटले. पण राजभवनानेच 2022 साली घोटाळा उघड केल्यावर देणगीदार हादरले व आपली फसवणूक झाली म्हणून पोलीस स्टेशनात तक्रार दाखल करायला गेले. यात काय चुकले? असा सवाल संजय राऊत यांनी न्यायालयाला केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 RR vs GT : हार्दिकसेना पहिल्या क्रमांकावर विराजमान; बलाढ्य राजस्थानला चारली धूळ!
- IPL 2022 RR vs GT : हार्दिक पंड्या इज बॅक..! कप्तानाच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरातचं राजस्थानला १९३ धावांचं आव्हान
- अखंड भारत झालाच पाहिजे, नवनीत राणांनी केले मोहन भागवतांचे समर्थन!
- PHOTOS :आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे फोटो समोर; चाहत्यांती उत्सुकता संपली
- मद्यविक्रीतून ठाकरे सरकार मालामाल, रेकॉर्डब्रेक उत्पन्न!


