Share

Sanjay Raut : “दिल्लीसमोर झुकल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रीपद…”, संजय राऊतांचा खोचक टोला

Published On: 

मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा फैसला आता सर्वोच्च न्यायालयातच लागेल. मुख्यमंत्री शिंदे हे तातडीने दिल्लीस पोहोचले आहेत. दिल्लीभेटीत त्यांनी मोदी-शहांच्या चरणी शिवसेना खासदारांचाही नजराणा चढवला व उपकाराच्या ओझ्यातून आणखी थोडे मुक्त झाले. स्वतःस शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणारे शिंदे वारंवार दिल्ली दरबारी का जात आहेत, हा प्रश्नच आहे. शिंदे हे म्हणे मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले. हे आक्रित आहे. यापूर्वी शिवसेनेचे तीन मुख्यमंत्री झाले. त्यातील दोन भारतीय जनता पक्षाबरोबरच्या ‘युती’त होते; पण एकही मुख्यमंत्री मंत्रिमंडळ काय व कसे करायचे याबाबत चर्चा करण्यासाठी कधी दिल्लीत गेला नाही. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रीपद मिळाले हे आता उघड झाले. दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकला नाही, झुकणार नाही हा स्वाभिमानाचा मंत्र निदान यावेळी तरी दिल्लीने मोडून दाखवला. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून लगावला आहे.

मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत आले व शिवसेनेच्या बारा खासदारांसोबत त्यांनी शक्तिप्रदर्शन केले व त्याआधी म्हणे या सर्व शक्तिमान खासदारांना केंद्र सरकारने ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली. खासदारांच्या मतदारसंघातील घरे व त्यांची कार्यालये पोलिसांनी वेढून ठेवली आहेत. या शक्तिमान, स्वाभिमानी खासदारांना इतके भय कोणाचे वाटत आहे? जनता आणि शिवसैनिक आपल्या सोबत असल्याचा दावा हे लोक करीत असतील व बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजे आम्हीच असे ते बोलत असतील तर केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या वेढ्यात फिरण्याची गरज नाही; पण चोराच्या मनात चांदणे असा हा प्रकार आहे आपण शिवसेनेशी, जनतेशी व महाराष्ट्राशी प्रतारणा करत आहोत ही जळजळ त्यांना अस्वस्थ करीत आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

एकंदरीत देशात कायद्याचे व संविधानाचे राज्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात ठिकठिकाणी महापुराचे, प्रलयाचे थैमान सुरू आहे. माणसे, गुरेढोरे, घरेदारे वाहून गेली आहेत. डोंगर, दरडी कोसळत आहेत. पण फुटीर गटाचे मुख्यमंत्री दिल्लीत राजकीय शक्तिप्रदर्शनात गुंग आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याच्या कार्यास त्यांनी वाहून घेतले आहे. महाराष्ट्रात दरडी कोसळल्याने वाहतूक, जनजीवन ठप्प झाले आहे, पण राज्यात सरकारचे अस्तित्व नाही. सरकार म्हणजे फक्त मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री नाही हे यांना सांगायचे कोणी? इंदूर-अमळनेर एसटीस भीषण अपघात घडून त्यात अनेक जीव प्राणास मुकले, पण राज्याला पंधरा दिवसांनंतरही परिवहन मंत्री नाही. त्यामुळे मृतांचे नातेवाईक व जखमींचे अश्रू हे बेसहाराच बनले. उपमुख्यमंत्री फडणवीस हे पूरपरिस्थितीची पाहणी करताना दिसत आहेत, पण त्यांचेही चित्त दिल्लीलाच लागून राहिले आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!