🕒 1 min read
मुंबई: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून, हल्ला करून माझ्या हत्येचा कट आखला होता, असा खळबळजनक दावा करत या घटनेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पोलीस अधिकारी सामील असल्याचा आरोप केला होता. यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या आरोपांनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी सामना अग्रलेखातून जयंत पाटील (Jayant Patil) यांची पाठराखण केल्याचे दिसून येते.
जयंत पाटील यांना जे ओळखतात त्यांना खात्रीने सांगता येईल की, कुणाला इजा करणे, कुणावर हल्ला घडवून आणणे अशी अचाट कामे करण्याची वृत्ती वाळव्याच्या पाटलांची नाही. पण भाजपचे एक आमदार पडळकर यांनी पाटलांनी आपल्यावर कसे मारेकरी घातले व आपण त्यातून कसे बचावलो याचे रसभरीत वर्णन केले व विरोधी पक्षनेते फडणवीसांनी त्यावरून सरकारवर हल्ले केले. विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिष्ठा अशामळे कमी होत असते याचे भान तरी माजी मुख्यमंत्र्यांनी ठेवायला नको काय? असा सवाल करत संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावरही तोफ डागली.
विरोधी पक्षनेत्यांनी पडळकरांवरील हल्ल्याबाबत सभागृह डोक्यावर घेतले, सिंधुदुर्गात संतोष परब या शिवसैनिकावर निर्घृण असा खुनी हल्ला झाला. भारतीय जनता पक्षाच्या उपन्या लोकांनी संतोष परब यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांनी परब यांच्यावरील हल्ल्यावर प्रश्न का उपस्थित केला नाही? सिंधुदुर्गात गेल्या तीसेक वर्षात अनेक राजकीय हत्या करण्यात आल्या व पचवून ढेकर देण्यात आले. राजकीय वरदहस्ताशिवाय ते शक्य नाही. श्रीधर नाईकापासून रमेश गोवेकरांपर्यंत ज्या हत्या झाल्या त्याच मालिकेत संतोष परबांनाही बसवायचे होते, पण परबांचे दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. पडळकर यांचे प्राण मोलाचे व संतोष परब यांचे मातीमोलाचे असे विरोधी पक्षनेत्यांना वाटत असेल तर ते योग्य नाही. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी या हल्ल्याकडे गांभीर्याने पहायला हवे व त्याचा तटस्थ अहवाल केंद्राकडे पाठवायलाच हवा. अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भ्रष्टाचाराच्या दृष्टीने विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर केले’, भाजपचा आरोप
- “भाजप पुढाऱ्यांच्या डोक्याचा केमिकल लोचा”, संजय राऊतांची खोचक टीका
- नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; आज होणार पुन्हा सुनावणी
- ‘…याने विद्यापीठाचा सत्यानाश होईल, तुमच्या PA कडे रांगा लागतील’, चित्रा वाघ यांचा घणाघात
- 2 जानेवारीला होणारी एमपीएससीची परिक्षा पुन्हा पुढे ढकलली; पुढील तारीख लवकरच होणार जाहीर


