मुंबई – परळी (जि.बीड) येथे शासनाच्या सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून झालेली बोगस व अर्धवट कामे, रखडलेली पाणी पुरवठा योजना, घाणीचे साम्राज्य या व अशा अनेक दाखल्यांसह पालिकेच्या अनागोंदी कारभाराचा पाढा वाचत केजच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी आज( शुक्रवार) सभागृहात लक्षवेधी मांडून सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी लावून धरली. दरम्यान, परळी शहरातील नगरोत्थान योजनेच्या कामांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी उत्तरात बोलतांना सांगितले.
परळी शहरात शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत रस्ते, नाल्या व इतर कामे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. ही कामे करताना पालिकेने कुठल्याही नियमाचे पालन केले नाही. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून देखील ही कामे नित्कृष्ट दर्जाची व अर्धवट स्थितीत झाली आहेत, याकडे आ. संगीता ठोंबरे यांनी आज सभागृहात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला.
शासनाने परळी शहरासाठी मंजूर केलेल्या ३५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम मार्च २०१९पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. वास्तविक ही योजना २०१२ मध्येच मंजूर झाली होती व २०१४ अखेर पर्यंत ती पूर्ण होऊन रहिवाशांना पाणी मिळायला हवे होते. पण अजूनही किरकोळ कामे, चाचणी अशी कारणे पुढे करून ही कामे रखडून ठेवल्यामुळे रहिवाशांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे, कच-याचे वर्गीकरण व योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अगोदरची कामे अर्धवट अवस्थेत असताना नवीन मलनिःस्सारण प्रकल्प टप्पा १ साठी १०१ कोटी ८६ लक्ष रूपये मंजूर केले गेले आहेत. या कामाच्या मंजूरीचा जीआर शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. शिवाय चढ्या दराने निविदा भरण्यात असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर असून ती रद्द करावी अशी मागणी आ. ठोंबरे यांनी केली.
दरम्यान, या प्रश्नांची दखल घेत नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी नगरोत्थान योजनेतील सर्व कामांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल व नंतरच पुढील कार्यवाही होईल, असे सांगितले.
विरोध विकासाला नाही, मलिदा लाटण्याला..
नगरोत्थान योजनेची नित्कृष्ट व बोगस कामे झाली आहेत, अशीच अवस्था पाणीपुरवठा योजनेची असून रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेचा अनागोंदी कारभार पाहता नवीन प्रकल्पाचीही तीच गत होणार आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी परळीच्या विकासाला कधीच विरोध केला नाही उलट सहकार्याची भूमिका ठेवली आहे, त्यांचा विकासाला विरोध नसून मलिदा लाटण्याला आहे असे आ. संगीता ठोंबरे या वेळी म्हणाल्या.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

