मुंबई : विधानपरिषदेत राज्यपालांना एकूण १२ लोकं आमदार म्हणून नामनिर्देशित करण्याचा अधिकार असतो.राज्य विधान परिषदेच्या १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्त्या ह्या जून महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबल्या होत्या. यानंतर, काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन १२ व्यक्तींच्या नावाची यादी सुपूर्द केली होती.
कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे. पण बऱ्याच वेळेस राजकीय पुनर्वसनासाठी या नियुक्त्यांचा वापर केला जातो.
नावं सुपूर्द केल्यानंतरही राज्यपालांनी बराच काळ घेतल्यामुळे ते महाविकास आघाडीने शिफारस केलेल्या नावांवर हरकत घेऊन शकतात अशी शक्यता वर्तवली जात असतानाच रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यपालांची भेट घेत सदाभाऊ खोतांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी दिली आहे. रयत क्रांती संघटनेकडून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे सुचवण्यात आलेली असून, तसे पत्र राज्यपालांना दिल्याचंही सदाभाऊ खोतांनी सांगितलं.
मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांच्या नावांची शिफारस सदाभाऊंनी राज्यपाल नियुक्त कोट्यातील आमदारकीसाठी केली आहे. या सर्व व्यक्ती त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय निर्णय घेणार यावर महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊत पुन्हा एकदा घेणार उद्धव ठाकरेंची मुलाखत; विषयावरून वाढली उत्सुकता
- परदेशातून आल्याने सरनाईक क्वारंटाईन; चौकशी पुढील आठवड्यात करण्यासाठी ईडीला विनंती
- ‘गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने जुन्या योजनांना केवळ स्थगिती देण्याचं काम केले’
- ‘सरनाईक कोरोनाला घाबरतायत की ईडीला?’
- भाजपच्या जाचाला, त्रासाला कंटाळून प्रवेश केलेल्या गायकवाड यांचे पक्षात स्वागत- जयंत पाटील


