मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आरक्षण व लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक विषमतेचे गंभीर परिणाम यावर भाष्य करण्यात आलं आहे. पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांतील अनेक नागरिकांना रोजगार गमवावा लागला असून आता उदरनिर्वाह करण्यासाठी या ‘व्हाईट कॉलर’ समजल्या जाणाऱ्या लोकांचा गुन्हेगारी क्षेत्राकडे कल वाढू शकतो अशी भीती सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली असून त्यासाठी सरकारने गांभीर्याने प्रयत्न केले पाहिजेत असा सल्ला देखील देण्यात आला आहे.
सामना अग्रलेख :
“मुंबई-पुण्यासारख्या शहरांत रोजगार देणारा प्रत्येक व्यवसाय पुढचे सहा महिने चालू राहील, याची काळजी घेतलीच पाहिजे. कायद्याचे पालन कोण किती करतो, यावर बोलायचे म्हटले तर अनेकांचे वस्त्रहरण होईल. जगा आणि जगू द्या या मंत्रानेच सगळ्यांना जगविता येईल. तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर तसे सांगावे. पांढरपेशे लोक पोटापाण्यासाठी गुन्हेगारीकडे वळत आहेत, ही धोक्याची घंटा सरकारच्या कानावर गेली तरी पुरे!”
ज्यातील दोन घटनांकडे आम्ही गांभीर्याने पाहत आहोत. पहिली घटना पिंपरी शहरातली आहे. पगारात भागत नसल्याने दोन उच्चशिक्षितांनी एटीएम मशीन फोडली व मोठी रक्कम लुटण्यात आली. दुसरी घटना नाशिकची आहे. सव्वादोनशे रुपये पगार झाल्याने एसटी कर्मचाऱ्याने जीवन संपवले. या दोन्ही घटना राज्यातील सध्याच्या स्थितीचे प्रातिनिधिक स्वरूप आहे. कोरोना व लॉक डाऊनचे हे ‘साइड इफेक्ट’ आहेत. लोकांचा रोजगार पूर्णपणे गेला आहे. त्यामुळे घर, संसार चालविण्यासाठी, पोराबाळांचे पोट भरण्यासाठी समाजातील पांढरपेशा वर्ग गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारू लागला आहे. मुंबई, ठाण्यासारख्या शहरांत मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यांत गेल्या महिनाभरापासून वाढ झाली आहे. हे त्याचेच लक्षण आहे. कोरोनामुळे राज्यभरात जनजीवन पूर्णपणे कोलमडून पडले आहे. अनेक व्यवसाय, छोटे उद्योग, मोठे व्यवसाय टप्प्याटप्प्याने ‘अनलॉक’ होत आहेत.
मंत्री, आमदार, खासदार वगैरे मंडळी विशेष काळजी व अंतर ठेवूनही त्यांना कोरोनाने गाठलेच आहे. तशीच काळजी आम्ही घेऊ, बाकी सगळे भगवान भरोसे, पण आम्हाला आता जिम, देवळे उघडू द्या. नाही तर देवावरचाच लोकांचा विश्वास उडेल, अशी एक भावना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेला संबोधताना या सर्वच मुद्दय़ांना स्पर्श केला. मंदिरे उघडण्याच्या सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले. नवरात्र, दिवाळीसारखे सण-उत्सव जवळ येत असताना एक एक पाऊल जपूनच टाकावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले तेही खरेच आहे.
शेवटी पालक म्हणून जनतेची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. लोकांनी आणि प्रशासकीय यंत्रणांनीही योग्य खबरदारी घ्यायला हवी. आता ‘रेस्टॉरंट’ सुरू करताच पोलिसांनी हॉटेलवर धाडी टाकायला सुरुवात केली. गोरेगावच्या एका बारमध्ये 11 बारबाला नृत्य करतात. अशातच हा बार उशिरापर्यंत सुरू होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ते खरे आहे, पण हा जो मोठा वर्ग याच व्यवसायावर जगत होता, तो सात-आठ महिन्यांपासून कसाबसा अर्धपोटी अवस्थेत जिवंत राहिला आहे. आता त्यांच्या रोजगार व पोटापाण्याची व्यवस्था सरकार किंवा प्रशासन करू शकेल काय? असा प्रश्न देखील विचारण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- चीनच्या मदतीने पुन्हा कश्मीरात 370 लागू करू, फारुख अब्दुला यांचे विषारी फुत्कार
- ‘राहुल आणि प्रियंका गांधी यांना शेळ्यामेंढ्यामधला फरक सुद्धा कळणार नाही’
- मुंबईत वीजपुरवठा खंडित तर महाराष्ट्र सरकार क-क-क… कंगना करण्यात व्यस्त !
- ‘सोशल मिडियावर एखाद्याला शिवीगाळ करणं… ट्रोल करणं… खाजगी आयुष्यात डोकावणं चुकीचं’
- शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल तातडीने सादर करा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

