मुंबई : भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्स संघातून बाहेरचा रस्ता दाखवल्याबाबत संघाचा कर्णधार रोहित शर्माने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हार्दिक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू होता पण नियम असे होते, की त्याला सोडावे लागले, असे त्याने म्हटले आहे.
आयपीएल २०२२च्या मेगा लिलावापूर्वी हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने रिलीज केले होते. क्रिकेट चाहत्यांसाठी हा एक आश्चर्याचा निर्णय होता. हार्दिक २०१५मध्ये मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आणि २०२१ पर्यंत या संघासोबत खेळला. मात्र, या मोसमापासून तो मुंबईच्या जर्सीत दिसणार नाही.
रोहित म्हणाला, “हार्दिक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा सदस्य होता, यात शंका नाही. त्याचे योगदान कधीही विसरता येणार नाही. आमच्या यशात त्याचे मोठे योगदान आहे. आता तो दुसऱ्या संघाचा कर्णधार आहे. त्याच्यासाठी हे एक वेगळे आव्हान असेल. इथे तो खूप परिपूर्णतेने खेळला. त्याच्या कामगिरीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. पण नियम असे होते, की त्याला सोडावे लागले. पण यावेळी आमच्या संघात अनेक मॅचविनर आहेत. आणि मी याबद्दल खूप उत्सुक आहे.”
हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या ९२ सामन्यांमध्ये १४७६ धावा केल्या आणि ४२ बळीही घेतले. गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून हार्दिकची कामगिरी कशी होते हे पाहायचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

