मुंबई : काल म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक स्थापना दिवस पार पडला. १ नोव्हेंबर १९५६ रोजी देशाच्या नकाशावर कर्नाटक राज्य उदयास आले आणि तत्कालीन सत्तेतील कानडी नेत्यांच्या मुत्सद्देगिरीमुळे मराठी भाषिक बहुसंख्य असून देखील बेळगावपर्यंतच्या भागाचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सुरु झालेला सीमावाद आजतागायत तेवत आहे.
बेळगावमधील मराठी भाषिक कर्नाटक स्थापना दिवस काळा दिवस म्हणून निषेध देखील नोंदवतात. याच मुद्द्यावरून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी ”सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील,” असं विधान करून संघर्ष करणाऱ्या नागरिकांना एकप्रकारे आव्हानच दिलं आहे. सवदी यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेने सामनातून लक्ष्य केलं आहे.
“महाराष्ट्राची बांधिलकी बेळगावसह संपूर्ण सीमा बांधवांशी आहे. सीमाप्रश्नी 69 हुतात्मे देणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष आहे. सीमा प्रश्नासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला आहे. ”सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील,” अशी अरेरावीचे भाषा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आज करीत आहेत. त्यांनी एक लक्षात घ्यावे, सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करीत असतात. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत सांगायचे तर ”सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.” याद राखा! सूर्य-चंद्राच्याच साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेरावी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल!
महाराष्ट्रातील नेते कितीही ओरडत असले तरी जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार असल्याची आरोळी तेथील उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी ठोकली आहे. अशा आरोळय़ांची पर्वा न करता गेल्या 70 वर्षांपासून सीमा भागातील मराठी बांधवांचा लढा सुरूआहे. हा जो कोणी लक्ष्मण सवदी गोधडीत रांगत होता त्याआधीपासून 20 लाख मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करीत आहेत. सध्या बेळगावचा तिढा सर्वोच्च न्यायालयात लटकला आहे. त्यामुळे आता न्यायालयच काय ते ठरवेल.
सूर्य-चंद्र आकाशात आहेत की नाहीत हे पाहून सर्वोच्च न्यायालय बेळगावप्रश्नी निकाल देणार नाही आणि सूर्य-चंद्र हे काही कुणाच्या बापाचे नोकर नाहीत. सूर्याच्या ढळढळीत प्रकाशझोतात बेळगावचा लढा सुरू आहे. त्याच सूर्यप्रकाशात कानडी पोलीस ‘जय महाराष्ट्र’ म्हणणाऱया मराठी बांधवांवर अत्याचार करीत आहेत व रात्रीच्या अंधारात, चंद्राच्या शीतल प्रकाशात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवीत असतात. पण तेथील मराठी बांधवांचे मनोधैर्य खचले नाही हाच शिवरायांचा आशीर्वाद आहे.
कर्नाटक सरकारचा 1नोव्हेंबर हा स्थापना दिवस असतो. हा दिवस सीमा भागातील मराठी लोक ‘काळा दिवस’ म्हणून पाळतात. ही वेळ 20 लाख मराठी बांधवांवर कोणी आणली? भाषावार प्रांतरचना केल्यावर मराठी भाषिकांना त्यांच्या हक्काच्या राज्यात जाण्याचा अधिकार का नाकारला गेला? 20 लाख मराठी भाषिकांचा आक्रोश, किंकाळ्या, सांडलेले रक्त आणि बलिदानाची पर्वा न करता निव्वळ दडपशाही मार्गाने मराठी भावना चिरडून त्यांना कानडी मुलखात कोंबले हा अन्याय नाही का? हा अन्याय सूर्य- चंद्राच्या साक्षीनेच झाला.
लोकशाहीत 20 लाख लोकांच्या भावनेस किंमत नसेल तर तुमच्या त्या लोकशाहीची गरज ती काय? एखाद्या राज्याचा स्थापना दिवस हा पवित्र, मंगलमय दिवस असतो. त्या दिवसाला गालबोट लागू नये हे आमचेही मत आहेच, पण गेल्या साठेक वर्षांत मराठी माणूस, भाषा, संस्कृतीवर जे निर्घृण हल्ले तेथे सुरू आहेत त्याचाच हा उद्रेक असतो. कर्नाटक व महाराष्ट्राचे व्यक्तिगत भांडण असण्याचे कारण नाही. एक बेळगावचा वाद सोडला तर दोन राज्यांतील सामाजिक, सांस्कृतिक, व्यापारी नाते इतर राज्यांपेक्षा घट्ट आहे; पण कर्नाटक त्याच्या हद्दीतील 20 लाख मराठी बांधवांशी ज्या निर्घृणपणे वागत आहे तो प्रकार संतापजनक आहे.” असा घणाघात केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अंबानी कुटुंबाची ‘झेड प्लस’ सुरक्षेविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
- वैभव नाईकांचा जबरदस्त पलटवार, राणेंच्या गडाला लावला सुरुंग
- शरद पवारांनी एकनाथ खडसेंना वाचवण्याचाच प्रयत्न केला : अंजली दमानिया
- कांदा खरेदीवर लावलेले निर्बंध उठवण्याबाब मुख्यमंत्र्याचे केंद्राला पत्र; आता उत्तराची प्रतीक्षा
- रोमान्सचा बादशाह; बॉलीवूड किंग खानचा आज ५५वा वाढदिवस!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

