🕒 1 min read
मुंबई: शहरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स फाऊंडेशनने (आरएफ) शहरातील कोविड व्यवस्थापनाची गरज लक्षात घेत मदतकार्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेबरोबरचे सहकार्य अधिक वाढवत मुंबईतील कोविडविरोधातील लढाईसाठी रिलायन्सने काही महत्वाची पावलं उचलली आहेत.
सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या वतीने वरळीच्या एनएससीआय, वांद्रे-कुर्ला येथील ट्रायडंट हॉटेल आणि सेव्हन हिल्स रुग्णालयात 875 खाटा उपलब्ध करून देत त्याचे संपूर्ण व्यवस्थापन पाहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रिलायन्स फाऊंडेशनने हा निर्णय घेतला आहे.
रिलायन्स फाऊंडेशन एनएससीआय येथे 15 मेपासून अतिदक्षता विभागात नवीन 100 खाटा, कृत्रिम श्वसन यंत्रणा, विविध वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देणार आहे. तसेच सध्या कार्यरत असलेल्या येथील 550 खाटांच्या वॉर्डचे व्यवस्थापन आणि सर्व खर्च 1 मेपासून सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय करणार आहे. त्यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी अशी 500 जणांची टीम उपलब्ध करून दिली जाणार आहे.
रिलायन्स फाऊंडेशन सेव्हन हिल्स रुग्णालयात असलेल्या अतिदक्षता विभागातील 20 खाटांबरोबरच अन्य शंभर खाटांचे व्यवस्थापन करत आहे. आता येथील अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या 25 ने वाढवली आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागातील एकूण 45 खाटा आणि अन्य 125 खाटांचे व्यवस्थापन रिलायन्स करणार आहे.
दरम्यान, राज्यात मागील 24 तासात 71 हजार 736 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आत्तापर्यंत 36 लाख 1 हजार 796, रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.92 टक्के इतके आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आज (दि. 26 एप्रिल) 48 हजार 700 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सातत्याने वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येत ज्या दिवशी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने समाज माध्यमातून समाधान व्यक्त केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरून अमरावतीची बदनामी करू नका, आरोग्य विभागाचे आवाहन
- घर का भेदी..! युवतीने मित्राच्या मदतीने घरातून चोरले २० तोळे सोने
- ऑक्सिजनबाबत बुलडाणा प्रशासन गाफिल, आ.श्वेता महालेंची तक्रार
- होम आयसोलेशन बंद करून सक्तीचे विलगीकरण करा, मंत्री थोरात यांच्या सुचना
- ‘शैक्षणिक वर्ष संपल्याची घोषणा करा’, शिक्षणमंत्री गायकवाड यांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
