जळगाव : सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांना महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. इथं झालेल्या अतिवृष्टीमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्य लोकांचे संसार उन्मळून पडले आहेत. अशा पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करण्यासाठी जळगावातूनही पुढाकार घेतला जात आहे. मात्र, या मुद्द्यावरून जळगाव जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा राजकीय कलगीतुरा रंगला आहे.
अतिवृष्टीमुळे कोकण, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत महापुराने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जळगाव येथून व्यापारी, राजकीय पदाधिकारी व समाजसेवकांच्या मदतीने घरगुती साहित्यासह आवश्यक मदत पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसांत भाजप व सामाजिक संघटनांतर्फे मदतीचे ट्रक रवाना करण्यात आलेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी पुरग्रस्त भागात पाहणीनंतर त्या ठिकाणच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाजनांवर पलटवार केला आहे.
पूरग्रस्त भागात ढिसाळ नियोजन
राज्य सरकारवर टीका करताना गिरीश महाजन म्हणाले की, कोकणातील पुरानंतर रोष आहे. परंतु सरकार म्हणून काय करतेय. मुख्यमंत्री गेले तेव्हाही संतापले होते. लोकांच्या संतापानंतरही फक्त तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. अजुनही मदत पोहोचलेली नाही. तातडीची मदत दिली पाहिजे. त्याठिकाणी सगळे काही नष्ट झाले आहे. पंचनाम्याला एवढा वेळ का लागत आहे? पंचनाम्याला वेळ लागणार म्हटल्यावर लोकांनी काय खायचे. एवढा वाईट प्रकार कधीच पाहिला नाही. ढिसाळ प्रकार सुरू आहे.
कोरोना काळात गिरीश महाजन कोठे होते?
महाजनांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, विरोधक आरोप करत असले तरी मला राजकारणात जायचे नाही. माणूस म्हणून माणसाने मदत करणे आवश्यक आहे. गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी भरपूर काम केले असेल तर त्यांचे अभिनंदन. परंतु कोरोना काळात गिरीश महाजन हे जामनेरात किती दिवस होते हे त्यांनी सांगावे असे आव्हान पाटील यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना! ‘अदानी एअरपोर्ट’ची तोडफोड करताना शिवसैनिकांचा पाहा हा व्हिडिओ
- भाजप कार्यकर्त्यांना पाहून सांगलीत मुख्यमंत्री ठाकरेंनी पळ काढला? पाहा हा व्हिडिओ..
- ‘थप्पड मारण्याची वल्गना करणारा वाघ ३०-४० लोकांना पाहून भीतीने गाडीत लपून बसला!’
- ‘राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी मोदींची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला


