टीम महाराष्ट्र देशा : भाजपची सत्ता असलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेने महापौर कुस्ती चषक 2020 चं आयोजन केलं आहे. उद्या (ता. २०) चषकाला सुरुवात होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेच्या वादावरून संपूर्ण चषकावर प्रोटोकॉल भंगाचे संकट ओढवणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महापौर चषक निमंत्रण पत्रिकेत कुठलाही राजशिष्टाचार पाळण्यात आला नाही. या पत्रिकेत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना नाव टाकण्यासंदर्भात विचारणाही करण्यात आली नाही. हाच धागा पकडून पालकमंत्र्यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सोबतच प्रोटोकॉलचा भंग झाल्यानं कार्यक्रमावर शासकीय पैसे खर्च करू नये. हा सगळा खर्च अधिकाऱ्यांनी खिशातून करावा, असेही निर्देश वडेट्टीवार यांनी दिले.
महापौर कुस्ती चषक 2020 च्या उद्घाटनाचा मान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा असताना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना देण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या पालकमंत्र्यांनी थेट महापौरांवर एफआयआर दाखल करण्याची भूमिका घेतली आहे. ” मला न विचारता पत्रिकेत नाव टाकण्यात आलं आहे. तेही दुय्यमस्थानी. जनमानसात माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक कट रचण्यात आला आहे. असा आरोप करत वडेट्टीवार यांनी केला आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणातून मनपा आयुक्त संजय काकडे यांनी हात वर केले आहेत. आपण राजशिष्टाचारानुसार फायनल केलेली पत्रिका महापौरांनी मंजूर न करता स्वत:च्या मर्जीने पत्रिका तयार केली, अशी माहिती काकडे यांनी दिली. तर यासंदर्भात महापौर राखी कंचर्लावार यांनी पत्रिका पूर्ण प्रोटोकॉलनुसार असल्याचा दावा केला असून आम्ही पालकमत्र्यांचा मान राखतो म्हणून त्यांचं नाव पत्रिकेत टाकल्याचं महापौर राखी कंचर्लावार म्हणाल्या.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
