मुंबई : महाविकास आघाडी अडचणीत वगैरे काही नाही. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे त्यामुळे आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी अडचणीत आहे का?, या प्रश्नावर जंयत पाटील बोलत होते.
जंयत पाटील म्हणाले, अपक्षांशी विविधस्तरावर चर्चा सुरू आहे. योग्यवेळी याबाबत आपल्याला माहिती दिली जाईल. वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या वेळी लोकांची नाराजी होत असते. परंतु समाजवादी पक्ष हा भाजपविरोधी उत्तरप्रदेशमध्ये राहिलेला आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देतील, अशी खात्रीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवल्याच्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, सध्या कोरोनाची साथ आहे. कोरोनामुळे सर्व आमदार हे मुंबईत असावेत आणि मतदानासाठी उपलब्ध असावेत, यासाठी हे सर्व सुरु आहे. मतं तर दाखवूनच द्यायची असतात त्यामुळे कुणी कुणाला पळवण्याचा प्रश्नच येत नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रातील 6 जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र यावेळी भाजपने तीन उमेदवार उभे करून महाराष्ट्राची राज्यसभा निवडणूक अतिशय रंजक बनवली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि अनिल सुखदेवराव यांच्याशिवाय भाजपकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पियुष गोयल आणि अनिल सुखदेवराव हे निवडणूक सहज जिंकतील. मात्र धनंजय महाडिक यांना विजयासाठी शिवसेनेच्या उमेदवाराशी स्पर्धा करावी लागणार आहे.
10 जून रोजी महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


