मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. आता भोंग्याच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोंगे हटाव मोहीम हातात घेतली आहे. यामध्ये काल संध्याकाळपर्यंत प्रशासनाने धार्मिक स्थळांवरील जवळपास १०,९२३ लाऊडस्पीकर हटवले तर ३५,२२१ लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला आहे. यानंतर याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर ट्विट करत कौतुकाचा वर्षाव केलाय.
राज ठाकरेंनी ट्विटरवर एक पोस्ट केलीय. यामध्ये राज यांनी, “उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार,” असं म्हटलंय. पुढे बोलताना राज यांनी, ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. “आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!”, असं म्हटलंय. यानंतर याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटलांना याबाबत पत्रकार परिषदेत विचारलं असता ते म्हणाले कि, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मागे गुजरातचे कौतुक केले. आता ते युपीचे कौतुक करत आहेत. महाराष्ट्र सोडून इतर सर्व राज्यांचे कौतुक करण्यासाठी राज ठाकरे दौरे करतील. जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचे कौतुक करायचे नाही, असे बहुतेक त्यांनी ठरवलेले दिसते, अशी खोचक टीका त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या –


