निलंगा : तहसीलदारसाहेब, आमच्यासाठी फळे व बिस्कट पाठवू नका. आमच्याऐवजी शहरातील गोर गरीबांना फळे व बिस्कट पाठवा हे वाक्य आहे निलंगा येथील शासकीय क्वारंटन कक्षामध्ये भरती असलेल्या एका रुग्णाच्या तोंडचे. निलंगा येथील मशीदमध्ये मुक्कामी राहिलेल्या ८ परप्रांतीय प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या ८ जणांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या येथील स्थानिक २५ जणांना निलंगा येथील शासकीय क्वारंटाइन केंद्रात १४ दिवसासाठी क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. याठीकाणी शासनाच्यावतीने त्यांच्या खाण्या पिण्याची सोय करण्यात येत आहे.
तहसीलदार गणेश जाधव यांनी या केंद्रात क्वारंनटाइन करण्यात आलेल्या एका रुग्णाला भ्रमणध्वनी करुन या केंद्रात देण्यात येत असलेल्या सेवेबाबत चौकशी करुन केंद्रातील २५ जणांबाबत आस्थेवाईकपणे विचारपूस केली. काल फळे पाठवली होती. ती मिळाली का ? तुमच्यासाठी उद्या बिस्किट पाठवणार आहोत. आणखी काही अडचण असल्यास मला संपर्क करा असे तहसीलदार जाधव यांनी या रुग्णास सांगितले. त्यावर तो रुग्ण म्हणतो आम्हाला याठीकाणी कसलीही अडचण नाही. आमची नंबर एक सेवा करण्यात येत आहे. तलाठीसाहेब अधून मधून येत आहेत. साहेब आम्हाला काहीही अडचण नाही. त्यामुळे फळे व बिस्किट पाठवू नका ते येथे खराब होतील. आमच्या ऐवजी शहरातील गोर- गरीबांना द्या असे तहसीलदारांना तो म्हंटल्याचे तहसीलदार जाधव व त्या रुग्णामध्ये झालेल्या संवादाची क्लीप व्हायरल झाल्याने उघड झाले आहे. एकुणच क्वारंटाइन करण्यात आलेल्या या रुग्णांची शासनाकडून किती काळजी घेतली जाते, हेच या संवादामधून समोर आले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

