नवी दिल्ली : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 14 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार होती. मात्र शेतकऱ्यांच्या भारत बंदला मिळालेला पाठींबा पाहता सरकारने नमतं घेत एक दिवसा आधीच म्हणजेच 8 डिसेंबरलाच शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांसोबत चर्चा केली. दरम्यान, सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील ही बैठकही निष्फळ ठरली आहे. बैठकीत शेतकरी प्रतिनिधी मात्र त्यांच्या मागणीवर ठाम असून सरकारने कृषी कायदे रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकरी नेत्यांची आज केंद्र सरकारसोबत बैठक होणार नाही.
शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी सगळ्याच क्षेत्रातील लोक पुढे येत आहेत. अनेक खेळाडूंनी तर आपल्याला मिळालेले पुरस्कार परत करण्याचे जाहीर केले आहे. अशात पंजाबमधील कृषीतज्ज्ञ डॉ. विरेंद्र पाल सिंग यांनी सोमवारी केंद्र सरकारकडून देण्यात येणारा पुरस्कार घेण्यात नकार दिला. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सिंग यांनी हा पुरस्कार नाकारला. सिंग हे पंजाबमधील लुधियाना येथील कृषीविद्यापिठामध्ये मातीचे परिक्षण करणाऱ्या विभागाचे प्रमुख आहेत. सिंग यांना झाडांच्या पालनपोषणासंदर्भातील क्षेत्रात केलेल्या कामासाठी फर्टीलायझर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी नवी दिल्लीमध्ये पार पडला.
केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाचे मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांच्या हस्ते सिंग यांना सन्मानित करण्यात येणार होतं. सिंग यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ते मंचावर आले मात्र त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. आपले शेतकरी रस्त्यावर उतरलेले असताना मला माझी सदसद्विवेकबुद्धी हा पुरस्कार स्वीकारण्याची परवानगी देत नाही, असं सांगत सिंग मंचावरुन पुरस्कार न स्वीकारताच खाली उतरले.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे दिवस संपले’; वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल
- तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये प्रवेशबंदी! शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना दिली नोटीस
- मन जिंकलस पांड्या! दिलदारी दाखवत पांड्याने ‘मॅन ऑफ दि सिरीज’ पुरस्कार नटराजनला दिला
- मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर सुनावणी
- विधानपरिषदेच्या ५ नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार !


