अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील भरजवाडीच्या मल्हार बटुळे या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेत सांत्वन केलं. तसेच कुटुंबातील तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत 1 लाख रुपयांची आर्थिक मदतही कुटुंबाला देण्यात आली
यावेळी राज्यसरकारने सरसकट कर्जमाफी न केल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी प्रविण दरेकर म्हणाले, “हा हृदय हेलावणारा प्रसंग आहे. सरकार कर्जमाफी करत असताना शेतकरी आत्महत्या होत आहेत. यावर विचार करणे गरजेचे आहे. सरसकट कर्जमाफी झाली असती, तर ही वेळ आली नसती. सरकारने सरसकट कर्जमाफी न केल्यामुळे ही आत्महत्या झाली आहे.” तसेच ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोपही केला.
यावेळी या तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही आमदार मोनिका राजळे यांचेमार्फत घेत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. ते म्हणाले, “ही कर्जमाफी सरसकट नाही. ठाकरे सरकारने सरसकट कर्जमाफी करू म्हणून सांगितलं. मात्र तसं झालं नाही. शेतकऱ्यांच्या जेवढ्या प्रकारचे कर्ज आहे, त्याला एकदम मोकळं करा. कर्जमाफी तात्पुरती करुन उपयोग होणार नाही.”
दरम्यान, बटूळे यांचा मुलगा प्रशांत याने नुकतीच शाळेत ‘बळीराजा करू नको तू आत्महत्या’ हि भावनिक साद घालणारी कविता म्हंटली. मात्र त्याच्या वडिलांपर्यंत ही कविता पोहोचण्याआधीच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

