पुणे : राज्यासह देशभरात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अनेक शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी बेडही उपलब्ध होताना दिसत नाही. मात्र, या संकटाचा फायदा घेऊन काही विकृत लोक कोरोनाबाधितांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी याप्रकरणी बोगस डॉक्टराला बेड्या ठोकल्या आहेत
शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील श्री मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनावट नाव व एमबीबीएस चे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून गेली दोन वर्षापासून चालवत असणाऱ्या भामट्याला (बनावट डॉक्टर) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे. महेमुद फारुक शेख (रा. त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स ,कारेगाव ता. शिरूर जि. पुणे मूळ गाव पीर बुर्हाणनगर नांदेड ता. जिल्हा नांदेड) या बनावट डॉक्टरला अटक केली आहे. विशेष म्हणजे तो बारावी नापास असल्याची माहिती समोर आली आहे.
कारेगाव येथील मेहमूद फारुक शेख याने महेश पाटील नावाने बोगस सर्टिफिकेट घेऊन तो महेश पाटील नावाने श्री मोरया नावाचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवत असल्याबाबतची खबर डॉ.शीतलकुमार राम पाडवी या त्यांच्याच पार्टनरने स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना दिली होती आणि मग हा प्रकार उघड झाला आहे.
या बोगस डॉक्टरने बोगस डिग्रीच्या आधारे कारेगाव येथील पुणे नगर हायवे वरील, त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स मध्ये आपले स्वः मालकीचे हॉस्पिटल सुरू केले होते. त्यासाठी त्याला आवश्यक असणाऱ्या पैशांसाठी, त्याने नंदुरबार येथील आपले जुने मित्र डॉ. शीतलकुमार पाडवी यांना पैसे देण्याची गळ घातली. तसेच दोघांनी पार्टनरशिप करण्याचेही ठरविले. त्यामुळे डॉ. पाडवींनी, या बोगस डॉक्टर महाशयांना २०१८ मध्ये, आवश्यक असंणारी १७.५० लाख रुपयांची मोठ्ठी रक्कम दिली.आणि त्यामुळेच कारेगाव येथे ICU युक्त असे मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल, येथील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स मध्ये, संपूर्ण दुसऱ्या मजल्याचा ताबा घेत सुरू केले.
यातील दोन लाख रुपये इमारतीचे मालक ओस्तवाल यांच्या नावे महेश पाटील यांच्याकडे दिले आणि महेश पाटील यांनी ओस्तवाल यांच्याकडून करारकरून बिल्डिंग भाड्याने ताब्यात घेतली. हॉस्पिटलचे फर्निचर, हॉस्पिटलच्या साहित्य करता रोखीने अंदाजे 10 लाख रुपये व चेकद्वारे 5 लाख 50 हजार रुपये ओस्तवाल यांच्या नावे दिलेला 2 लाख रुपये याप्रमाणे 17 लाख 50 हजार रुपये महेश पाटील यांच्या नावाने दिले.
या हॉस्पिटलमध्ये लागणारा प्रशिक्षित स्टाफ देखील त्याने भरला. त्यात काही शिकाऊ व अनुभवी डॉक्टर्स व नर्सेस चा समावेश आहे. पुढे हॉस्पिटल सुरू केल्यानंतर काही दिवसांतच, कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे त्याने शक्कल लढवून, येथे कोव्हीडच्या रुग्णांचे उपचार सुरू केले होते.
याच महेश पाटील नावाच्या या व्यक्तीने ‘तुमची पार्टनरशिप नकोय तुमचे पैसे मी तुम्हाला परत देतो तुम्ही आता हॉस्पिटलमधून बाजूला व्हा. तुम्ही गुंतवलेले पैसे मी तुम्हाला देतो’ असे सांगून अंतर राखायला सुरुवात केली. यानंतर घेतलेल्या कर्जाचे हप्ते चालू होते व फसवणूक झाली असल्याचे डॉक्टर शीतलकुमार यांच्या लक्षात आले. परंतु. पैसे परत देतो यामुळे त्यांनी त्या वेळी कुठेही तक्रार दिली नाही
दरम्यान,या बोगस डॉक्टरने, पुन्हा एकदा आपला दुसरा डॉक्टर मित्र, डॉ. वळवी यांच्याकडे काही लाखांची मदत मागितली.परंतु या वळवींनी, डॉ. पाडविंशी संपर्क साधत, हा महेमुद शेख शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील आपल्या हॉस्पिटल साठी पैशांची मदत मागत असल्याचे सांगितले आणि त्यामुळेच या महेमुद शेख उर्फ डॉ. महेश पाटीलचे बिंग फुटले.
दरम्यान, मोरया हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टर असल्याचे समजल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मेहमुद फारुख शेख याला अटक केली आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव औद्योगिक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत पुढील तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- सचिन वाझे प्रकरणात नवा ट्वीस्ट, चौकशी करणाऱ्या NIAच्या IG शुक्लांची तडकाफडकी बदली
- कोणी बेड देता का बेड! उस्मानाबादेत कोरोना रुग्ण बेहाल, जमिनीवरच उपचाराची नामुष्की
- लॉकडाउनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आजच घेणार, मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दिले संकेत
- याला संधी तर देऊन बघा; श्रीसंतने केली होती द्रविडकडे संजु सॅमसनची शिफारस
- संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाहीतर आम्हीही दुकाने उघडणार,व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

