औरंगाबाद : कार्यालयात वाढदिवस साजरा करणे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील तहसीलदारांच्या अंगलट आला आहे. गेल्यावर्षी त्यांनी साथरोग प्रतिबंध कायदा धाब्यावर बसवत चक्क नेवासा तहसील कार्यालयातच दणक्यात वाढदिवस साजरा केला होता. त्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलिसांना तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदने देण्यात आली. पण जिल्हा प्रशासनाने कारवाई केली नाही. त्यामुळे याविरोधात हायकोर्टात दाद मागण्यात आली आहे. तहसीलदार सुराणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे.
रहिवासी संजय नराळे यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, २३ जून २०२० रोजी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी जमावबंदीचा भंग करून शासनाने कोरोना काळात घालून दिलेले नियम पायदळी तुडवत १५ ते २० जणांसोबत धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे, तहसील कार्यालयातच त्यांनी वाढदिवस साजरा केला.
यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. मास्क न वापरल्याने कोरोनाच्या नियमांना हरताळ फासण्यात आला. तहसीलदार हे तालुका दंडाधिकारी असतात. त्यांनीच कोरोना प्रतिबंध नियमावली पायदळी तुडवली. त्याविरोधात जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणेकडे अनेकांनी तक्रारी केल्या; पण कारवाई करण्यात आली नाही की गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सर्वसामान्यांना एक न्याय आणि अधिकाऱ्यांना सूट असा अन्याय का, असा सवाल याचिकेत करण्यात आला आहे.
राज्य शासन, नाशिक येथील विभागीय आयुक्त, नगर पोलीस अधीक्षक, नेवासा पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. सुराणा यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस मंत्र्याचे आवाहन, ‘केंद्राने राज्यासाठी दिलेल्या ‘या’ निधीचा लाभ घ्या’
- ‘सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी नवे नियम’, मोदी सरकारची संयुक्त राष्ट्रात भूमिका
- ‘जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देऊनच विधानसभा निवडणुका घ्या’
- ‘मराठा व ओबीसी आरक्षण ही तुमची जबाबदारी, केंद्राकडे बोट दाखवू नका’, पंकजा मुंडेंचा ठाकरेंना इशारा
- दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलंय, हे लक्षात ठेवावे-हसन मुश्रीफ


