औरंगाबाद : निवासी भागात कोविड केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी कशी मिळाली तसेच कोरोना बाधित रुग्णाचे नातेवाईक रात्री पार्किंग मध्ये झोपतात गोंधळ घालतात या कारणावरून खाजगी कोविड सेंटर हॉस्पिटलची लिफ्ट बंद केल्याचा प्रकार दुर्गानंद हाईट्समधील सुभश्री हॉस्पिटल मध्ये घडला. लिफ्ट बंद झाल्याने कोरोना बाधित रुग्णांना वरच्या मजल्यावर ऑक्सीजन सिलेंडर नेता येणे शक्य नसल्याने हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली.
यावेळी पोलिसांनी नागरिक आणि हॉस्पिटल प्रशासनामध्ये केलेल्या मध्यस्थीनंतर रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करण्यासाठी लिफ्ट सुरू करण्यात आली. हा प्रकार सोमवारी पुंडलिक नगर ठाण्याचा हद्दीत घडला. याप्रकरणी उपनिरीक्षक बीजी घोडके हे वरिष्ठांसह कर्तव्यावर असतांना सुभश्री हॉस्पिटलचे डॉ. उदयसिंह राजपूत यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत नागरिकांनी लिफ्ट बंद केल्याची गोष्ट सांगितली.
दरम्यान हॉस्पिटल मध्ये बारा रुग्ण ऑक्सिजनवर होते. सदर हॉस्पिटल हे दुर्गानंद हाइट्स मध्ये असून १४ रहिवाशांनी लिफ्ट बंद केली असून ऑक्सिजन संपल्याने वर सिलेंडर नेण्यास नागरिक बाधा आणत असल्याचे पोलिसांनी सांगत कोरोना रुग्णांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर आपणच तोडगा काढावा अशी विनंती केली.
यावर पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनशाम सोनवणे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेत इमारतीमधील नागरिक आणि विकासक यांना बोलावून चर्चा केली. रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेतले यावेळी रुग्णांचे नातेवाईक आक्रमक झाल्याचे लक्षात येताच कोरोनाचे गांभीर्य ओळखून एपीआय सोनवणे यांनी सर्वांचे समुपदेशन केले. अखेर इमारत धारक रहिवाशांनी डॉक्टरांना लिफ्ट सुरू करण्यासाठी चावी दिली.आणि ऑक्सिजन सिलिंडर नेता आले.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु – जयंत पाटील
- पुणे : अपयश झाकण्यासाठी भाजपकडून कोरोनाबाधित मृतांच्या आकडेवारीची लपवाछपवी?
- औरंगाबादेत ‘या’ चार नामांकित रुग्णालयात फायर सेफ्टी, मात्र हाताळण्याचे कौशल्यच नाही!
- आधी रक्तदान करा आणि त्यानंतरच कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या – विजय वडेट्टीवार
- राज्यभर आरोग्य सुविधांचा बोजवारा, आरोग्यमंत्री फक्त तोंडपाटीलकीत बिझी


