परभणी: जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी गेल्या दोन दिवसापासून आंदोलन सुरु केले आहे. ता. २१ व २२ जुन रोजी अर्धवेळ काम बंद आंदोलन करण्यात आले होते. बुधवारी दि. २३ जून रोजी सकाळपासून परिचारिकांनी पूर्णवेळ कामबंद आंदोलन केले. यावेळी जिल्हा रुग्णालयातील सर्व परिचारिका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कामकाज पूर्णत: ठप्प पडले होते.
सर्वस्तरावरील १०० टक्के कायमस्वरुपी पदभरती करण्यात यावी, अतिरिक्त खाटांसाठी नव्याने पदनिर्मिती करण्यात यावी, परिसेविका, अधिसेविका व पाठ्य निर्देशिका पदाची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावी या इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्यावतीने बुधवारी (ता. २३) जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी काम बंद आंदोलन केले. दरम्यान, परिचारिकांनी पुकारलेल्या बंदमुळे कामकाज ठप्प पडले होते.
राज्यातील परिचारिका संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता द्यावा, कोविड काळात सात दिवस कार्यकाळ व तीन दिवस अलगीकरण रजा कायम ठेवावी, कोरोना काळात बंद केलेली साप्ताहिक सुट्टी ही देण्यात यावी, कोरोना काळात परिचारिकांच्या रजा स्थगित केल्यामुळे अर्जित रजा ३०० पेक्षा जास्त शिल्लक राहून रद्द होत आहेत. त्या शिल्लक ठेवण्याची व पुन्हा उपभोगण्याची परवानगी देण्यात यावी आदी १२ मागण्या परिचारिका संघटनेच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
जिल्हा रुग्णालयातील सर्व परिचारिकांनी बुधवारी आंदोलन पुकारल्याने दवाखान्यातील सुश्रुषांची कामे बंद पडली होती. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने तातडीने शिकाऊ परिचारिकांना या कामी तैनात केले. दिवसभरात याच परिचारिकांनी कामे सांभाळली. आम्ही आमच्या मागण्यासाठी वारंवार संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे निवेदन पाठवित आहोत. मागण्या पूर्ण न झाल्यास ता. २५ जून पासून आम्ही बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय संघटनेने घेतल्याची माहिती पतीचारिका संघटनेच्या उपाध्यक्ष सुजाता कांबळे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- सावधान ! ‘डेल्टा प्लस’चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
- ‘शिवसेनेची विचारसरणी सहन करू शकतो, पण..’ पृथ्वीराज चव्हाणांची ‘लेटरबॉम्ब’वर प्रतिक्रिया
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार


