बीड : माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १८ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याची बाब समोर आली आहे. कारखान्याने पगार न दिल्याने कर्मचाऱ्यांनी आज बुधवारी कारखाना बंद केला आहे. पगार नाही तोपर्यंत कारखाना सुरू करणार नसल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी कारखान्याचे कार्यकारी संचालकांना निवेदन दिले होते. वैद्यनाथच्या कर्मचाऱ्यांचा गेल्या १८ महिन्यांपासून पगार थकीत आहे. पगार १० दिवसांत आमच्या खात्यात वर्ग करा अन्यथा आम्ही कारखाना बंद करू असा इशारा निवेदनात देण्यात आला होता. दहा दिवस होऊनही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळ पासूनच कारखाना बंद केला. या संपात वजन काटा, सर्व कार्यालयाचे कर्मचारी, उत्पादन युनिटचे कर्मचारी सहभागी झालेत.
दरम्यान, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी अत्यंत मेहनतीने उभा केला. या कारखान्याने उत्पादनाचे अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. यामुळे कारखान्याचे नाव आशिया खंडात झाले होते. दरम्यान, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर कारखान्यासमोर गेल्या काही वर्षापासून अनेक अडचणी निर्माण झाल्यात.
दोन वर्षांपूर्वी कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी पगारासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हा बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठीही विरोधकांनी अनेक अडचणी निर्माण केल्या होत्या. पण पंकजा मुंडे यांनी यातून मार्ग काढत कारखाना सुरू केला. पण पुन्हा कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी कारखाना बंद केला. या संपाबदल कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- महानिर्मितीने रचला इतिहास, ६० वर्षातील सर्वाधिक वीज निर्मिती
- दो हंसो का जोडा! विलासरावांच्या पुतळ्याशेजारी गोपीनाथ मुंडेचा पुतळा उभारणार
- महंगाई की मार! पेट्रोल-डिझेल नंतर आता खत ही महागले
- सव्वीस कोटींच्या ठेवी बुडवणारा चेअरमन अखेर शरण
- धक्कादायक! किरकोळ कारणावरून चुलत्याने पुतणीचा कोयत्याने कान कापला


