लातूर : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. दोघेही आजन्म विरोधी पक्षांत राहिले. पण हयात असेपर्यंत दोघांनीही आपल्या मैत्रीत कधीच अंतर पडू दिलं नाही. विलासराव देशमुख लातूरचे, तर गोपीनाथ मुंडे बीडचे. त्याकाळी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना ‘दो हंसो का जोडा’ असे संबोधले जात असे. मात्र, मृत्यूनंतरही त्यांच्यात अंतर पडत पडणार नसल्याचे दिसत आहे. कारण लातूर जिल्हा परिषदेच्या परिसरात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याशेजारी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
देशमुख यांच्या जिल्हा परिषदेतील पुतळ्याशेजारी मुंडे यांचा पुतळा उभारण्याच्या निर्णयाला जिल्हा परिषदेने चालना दिली. पुतळा उभारणीसाठी अर्थसंकल्पात साठ लाख रुपयांची भरीव तरतूद करताना दुसरीकडे रेणापूर पंचायत समितीच्या आवारात मुंडे यांचे स्मारक उभारण्याचाही निर्णय घेतला. या ठरावाला मंजूर करताना दुसरीकडे देशमुख यांच्या स्मृतीभवनासाठी लातूर पंचायत समिती सभापतींच्या निवासस्थानाची जागा सांस्कृतिक कार्य विभागाकडे हस्तांत्तरीत करण्याला सभेने मान्यता दिली.
लातूर पंचायत समिती सभापतींच्या निवासस्थानात विलासराव देशमुख यांचे स्मृतीभवन उभारण्यासोबत तिथे दक्षिण मराठवाड्याचे दर्शन घडविणारे प्रादेशिक शासकीय संग्रहालय निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी निवासस्थानाची जागा ग्रामविकास विभागाकडून सांस्कृतिक विभागाकडे हस्तांत्तरीत करण्याला मान्यता देण्याचा विषय सभेत आला.
जिवाभावाची मैत्री
राजकारणापलीकडे मैत्री जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे. विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीत आणि राजकीय वाटचालीत अनेक सारख्या गोष्टी पाहायला मिळतात. दोघांनीही सामान्य कुटुंबातून येऊन राज्य व देशाच्या राजकारणात आपला एक वेगळा ठसा निर्माण केला. दोघेही लोकनेते होते. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांची मैत्री राहिली. 1980 च्या दशकात दोघेही आमदार म्हणून एकाच वेळी विधानसभेवर गेले. देशमुख हे काँग्रेसचे, तर मुंडे हे विरोधी पक्षाचे नेते. दोघांची मैत्री असल्याने त्यांनी एकदाही एकमेकांना पाडायचा प्रयत्न केला नाही. उलट एखादा अडचणीत असेल तर त्याला सहकार्य करीत मैत्रीचे नाते अधिक दृढ करण्याचाच त्यांनी प्रयत्न केला.
महत्वाच्या बातम्या
- महंगाई की मार! पेट्रोल-डिझेल नंतर आता खत ही महागले
- सव्वीस कोटींच्या ठेवी बुडवणारा चेअरमन अखेर शरण
- नोकरीचे आमिष दाखवत साडे आठ लाख रुपये उकळले
- परभणी डीसीसी निवडणूक; महाविकास आघाडीत जागेच्या वादावरून बिघाडी
- नांदेड ते जालना द्रूतगती मार्गासाठी ७ हजार कोटी, समृद्धी महामार्गाशी जोडणार


