पंढरपूर : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.या निवडणुकीसाठी २३ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून ३० मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर ३ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा मतदारसंघ खिशात घालण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर येथे महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचे दिसत आहे.
महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखाने बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बैलगाडीत बसून येत मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
शैला गोडसे हे गेल्या निवडणुकीपासून उमेदवारी मागत होत्या मात्र गेल्यावेळीही त्यांना उमेदवारी नाकारल्याने यंदा त्यांनी बंडाचा झेंडा फडकावीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.शैला गोडसे या सोलापूर जिल्हा परिषद सदस्य असून वाड्यावस्त्यांपर्यंत त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. जनतेसाठी वारंवार आंदोलने करणाऱ्या शैला गोडसे या महिला वर्गात विशेष लोकप्रिय असून जनतेच्या रेट्यामुळेच आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी,व्यापारी,तरुण,महिला यांच्या या मतदारसंघातील अनेक समस्या प्रलंबित असल्याचा फटका देखील महाविकास आघाडीला बसू शकतो.सहकारी पक्षांशी योग्य समन्वय न राखता केवळ सहानभुतीच्या जोरावर आपण पंढरपूरचे मैदान मारू अशा भ्रमात राष्ट्रवादी गाफील राहिली तर मोठे नुकसान याठिकाणी होऊ शकते. महाविकास आघाडीने गोडसे यांनी आपला निवडणूक लढविण्याचा इरादा न बदलल्यास महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा फटका बसेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने अद्याप आपला उमेदवार घोषित केला नाही. या दोन्ही पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
राष्ट्रवादीकडून भालके यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे. त्यातही भगीरथ भालके यांच्या नावाला काहींचा विरोध असल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून माजी आमदार राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. समाधान आवताडे, अभिजित पाटील हे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.याशिवाय वंचित बहुजन आघाडी देखील ही निवडणूक लढविणार असल्याने महाविकास आघाडीसाठी लढाई सोपी नसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वाईट सुरुवातीनंतरही भारतीय संघ कसा उभारतोय मोठी धावसंख्या
- पांड्याला गोलंदाजी न देण्याचं कारण ऐकून सेहवाग कोहलीवर भडकला
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- फुकटात मंत्रिपद मिळालंय, म्हणून आव्हाडांची वळवळ सुरु आहे – राणे
- शेतकऱ्यांची वीज तोडली;भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

