मुंबई: निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचे निधन झालं आहे. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 91 व्या वर्षी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी बाणेरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. पुण्यातील पहिली एल्गार परिषद पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती.
सावंत यांच्या निधनाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे न्यायदानाच्या क्षेत्रातील आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीतील कार्य सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पी.बी.सावंत यांना श्रद्धांजली वाहिली.
न्या. पी.बी. सावंत यांनी न्यायादानाच्या क्षेत्रात महाराष्ट्राची प्रतिमा उजळून टाकणारे कार्य केले आहे. गाढा अभ्यास आणि विविध विषयांतील प्रभुत्व यामुळे त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या संस्था, आयोग, लवाद याठिकाणी काम करताना आपला असा ठसा उमटवला आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी समाज प्रबोधन आणि सामाजिक चळवळीत काम करताना मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली आहे. न्याय व विधी क्षेत्रात मोलाचे कार्य करतानाच त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीत निर्भीड आणि परखड विचारधारा कायम राहील यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या जाण्याने या दोन्ही क्षेत्रासाठींचे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचेदेखील ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे नंतर त्यांनी जबाबदारी सोडली होती.
पी. बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला होता. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एल.एल.बी) मिळविल्यानंतर सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे वकील म्हणून सराव सुरू केला.
1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. 1989 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर सहा वर्ष त्यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले. 1995 मध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून ते सार्वजनिक कार्यात सक्रिय होते.
महत्वाच्या बातम्या
- वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या लाइनमनवर ऑइल टाकून मारहाण
- … म्हणून थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडून वीजबिलांची वसूली करण्यावर महावितरण आहे ठाम
- एमसीएच विंगला मिळणार हिरवा कंदिल..? वैद्यकीय शिक्षणमंत्री आज घाटीत
- ‘२२ वर्षीय विद्यार्थिनी देशासाठी धोका असेल तर देश कमकुवत मुल्यांवर उभा आहे.’
- उदगीरच्या पोलीस अधिकाऱ्याची पोलीस ठाण्यात आत्महत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

