मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हा ठाकरे सरकारसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.
हे आरक्षण रद्द झाल्यानंतर आता ओबीसी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे सरकारमध्ये मंत्री असलेल्या ओबीसी नेत्यांनी देखील कंबर कसली असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी) आरक्षण पुन्हा बहाल केले जात नाही, तोवर राज्यात कोणतीही निवडणूक घेऊ नये अशी मागणी राज्यातील ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले कि, ‘ ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आम्ही ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोवर स्थानिक स्वराज्य संस्थेची कोणतीही निवडणूक घेऊ नये अशी मागणी केली आहे.
तसेच निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक होती, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजपने ओबीसी आरक्षणावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण भाजपच्या आंदोलना आधीच निवडणुका न होऊ देण्याचा आम्ही इशारा दिला आहे. त्यामुळे आता भाजपचे वरातीमागून घोडे आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. तसेच ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ नये या मुद्दयावर आम्ही ठाम आहोत. मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा झाली असून ही चर्चा सकारात्मक झाली आहे, असा दावाही त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात तुफान गर्दी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक
- राजकीय भूकंपाची नांदी ? दिल्लीत शरद पवारांचे प्रशांत किशोरांसोबत खलबतं
- ‘आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही, शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट’
- ‘समांतर २’ चा ट्रेलर प्रदर्शित, ‘या’ अभिनेत्रीची झाली एन्ट्री
- ‘कसोटी चॅम्पियनशीप गेली खड्डयात पण….’ सोशल मीडीयावर विराटकडे केली ‘ही’ मागणी


