🕒 1 min read
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी रोज नवीन घडामोडी समोर येत असून त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. तर, एटीएसने देखील सचिन वाझेंना या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून घोषित केलं आहे.
त्यांनतर सचिन वाझेंच्या नियुक्तीवरून आरोप करत भाजपने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, वाझेंच्या नियुक्तीवरून व काही गंभीर चुकांमुळे पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले. यामुळे परमबीर सिंह हे नाराज झाले असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून मोठा गौप्यस्फोट केल्या आहे. अनिल देशमुख हे सचिन वाझेंना महिन्याभरात १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट द्यायचे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.
या सर्व नाट्यमय घडामोडींमुळे राज्यासह देशाचे राजकारण देखील तापले आहे. या प्रकरणासंदर्भात भाजपने सुरुवातीपासून महाविकास आघाडी सरकारला घेरलं होतं. तर आता यामध्ये इतर अधिकाऱ्यांकडून देखील नवनवीन गौप्यस्फोट केले जात आहेत. मात्र हे सर्व विरोधी पक्षाने महाराष्ट्रातील सरकार खिळखिळे करण्यासाठी या अधिकाऱ्यांशी संगनमत केले. तसेच उधळलेल्या घोडय़ांना खरारा करण्याचे व त्यांना हरभरे टाकण्याचे काम विरोधकांनी हाती घेतले असले तरी हे ‘सब घोडे बारा टके’च आहेत. अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
‘राज्याच्या गृहमंत्र्यांवर वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे अद्यापि शासनाच्या सेवेत आहेत याचे आश्चर्य वाटायला हवे. परमबीर सिंग यांनी फक्त गृहमंत्र्यांवर आरोपच केले नाहीत, तर आपण केलेल्या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी यासाठी हे महाशय सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. इतके होऊनही त्यांच्यावर सेवाशर्ती भंगाचा बडगा ठेवून कारवाई केली गेलेली नाही. दुसरे एक अधिकारी संजय पांडे यांनीही मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून ‘बढती’प्रकरणी आपल्यावर कसा अन्याय झाला हे स्पष्ट केले. श्री. पांडे यांनी त्यांच्या पत्रात इतरही बरेच मुद्दे उपस्थित केले आहेत.
परमबीर सिंग यांचे पत्र ज्यांना इतके महत्त्वाचे वाटले, त्यांनी अनुप डांगे या पोलीस अधिकाऱ्याने परमबीर यांच्याबाबत लिहिलेल्या पत्रासही मस्तकी लावून न्याय केला पाहिजे. भाजपचा हा सर्व खटाटोप का व कशासाठी चालला आहे ते जनतेला माहीत आहे. राष्ट्रपती राजवट लावून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करायची हाच त्यांचा मुख्य हेतू आहे. राज्य सरकारने दीड वर्षात पोलीस आणि प्रशासनावर मांड ठोकली नाही, त्यामुळे काही घोडे उधळले हे स्पष्ट आहे. त्या उधळलेल्या घोडय़ांना खरारा करण्याचे व त्यांना हरभरे टाकण्याचे काम विरोधकांनी हाती घेतले असले तरी हे ‘सब घोडे बारा टके’च आहेत. अशा घोडय़ांवर शर्यती जिंकता येत नाहीत !अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण ; ‘हा’ खेळाडू इतक्या दिवस राहू शकतो क्रिकेटपासून दूर
- ‘अस्तनीतील हे निखारे राज्य सरकारने पदरी बाळगले होते’
- प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल-भुवी बद्दल वीरूचे भन्नाट ट्विट व्हायरल
- ‘विरोधी पक्षाने सरकार खिळखिळे करण्यासाठी या अधिकाऱ्यांशी संगनमत केले’
- धवन-रोहित जोडीने मोडला सचिन-सेहवागचा रेकॉर्ड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
