मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी रोज नवीन घडामोडी समोर येत असून त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. तर, एटीएसने देखील सचिन वाझेंना या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून घोषित केलं आहे.
त्यांनतर सचिन वाझेंच्या नियुक्तीवरून आरोप करत भाजपने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, वाझेंच्या नियुक्तीवरून व काही गंभीर चुकांमुळे पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले. यामुळे परमबीर सिंह हे नाराज झाले असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून मोठा गौप्यस्फोट केल्या आहे. अनिल देशमुख हे सचिन वाझेंना महिन्याभरात १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट द्यायचे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.
या सर्व नाट्यमय घडामोडींमुळे राज्यासह देशाचे राजकारण देखील तापले आहे. या प्रकरणासंदर्भात भाजपने सुरुवातीपासून महाविकास आघाडी सरकारला घेरलं होतं. तर आता यामध्ये इतर अधिकाऱ्यांकडून देखील नवनवीन गौप्यस्फोट केले जात आहेत. मात्र हे सर्व विरोधी पक्षाने महाराष्ट्रातील सरकार खिळखिळे करण्यासाठी या अधिकाऱ्यांशी संगनमत केले आणि अस्तनीतील हे निखारे राज्य सरकारने पदरी बाळगले होते. अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
‘राज्याच्या गृहमंत्र्यांवर वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे अद्यापि शासनाच्या सेवेत आहेत याचे आश्चर्य वाटायला हवे. परमबीर सिंग यांनी फक्त गृहमंत्र्यांवर आरोपच केले नाहीत, तर आपण केलेल्या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी यासाठी हे महाशय सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. इतके होऊनही त्यांच्यावर सेवाशर्ती भंगाचा बडगा ठेवून कारवाई केली गेलेली नाही. दुसरे एक अधिकारी संजय पांडे यांनीही मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून ‘बढती’प्रकरणी आपल्यावर कसा अन्याय झाला हे स्पष्ट केले. श्री. पांडे यांनी त्यांच्या पत्रात इतरही बरेच मुद्दे उपस्थित केले आहेत.
राजकीय दबाव, बरी-वाईट कामे करून घेण्याविषयी सरकारचे दाबदबाव याविषयी स्फोट केले आहेत. पांडे हे महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत, पण पोलीस आयुक्त, राज्याच्या महासंचालकपदी नेमणुकांत त्यांना डावलले गेल्याचा आरोप त्यांनी केला. पांडे व परमबीर सिंग यांनी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या इथपर्यंत सर्व ठीक, पण या भावना प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचतील व सरकारच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण होईल याची चोख व्यवस्था त्यांनी केली आहे. या दोन पत्रांचा आधार घेऊन राज्यातील विरोधी पक्ष जो नृत्याविष्कार करीत आहे तो मनोरंजक आहे. या जोडीला सुबोध जयस्वाल, रश्मी शुक्ला वगैरे वरिष्ठ अधिकाऱयांनी सरकारला अंधारात ठेवून केलेल्या ‘फोन टॅपिंग’ प्रकरणाचा अहवाल घेऊन विरोधी पक्षनेते दिल्लीदरबारी पोहोचले आहेत. म्हणजेच, राज्याच्या प्रशासनातील हे लोक एका राजकीय पक्षाची सेवा बजावत होते.
विरोधी पक्षाने महाराष्ट्रातील सरकार खिळखिळे करण्यासाठी या अधिकाऱ्यांशी संगनमत केले आणि अस्तनीतील हे निखारे राज्य सरकारने पदरी बाळगले होते. ज्या सरकारचे पिंवा राज्याचे मीठ खातो त्याच राज्याची बदनामी करण्याचे हे कारस्थान आहे व त्यामागे राज्यातील उठवळ विरोधी पक्षाचा हात आहे हे आता स्पष्ट झाले आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रावरून लोकसभा आणि राज्यसभेतील भाजप खासदार आक्रमक झाले. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करावे अशा पद्धतीचा गोंधळ या लोकांनी घातला. प्रश्न असा आहे की, हे सर्व लोक मूर्खांच्या नंदनवनात जणू ‘बेवडा’ मारून फिरत आहेत. परमबीर सिंग यांनी शिस्तभंग केला व स्वतःची कातडी वाचविण्यासाठी आरोपांचा धुरळा उडवला आहे हे काय या मूर्खांच्या शिरोमणींना माहीत नाही? परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात केलेले आरोप गंभीर आहेत व त्याची नक्कीच चौकशी व्हावी, पण भाजपवाल्यांच्या प्रिय गुजरात राज्यात संजीव भट्ट व शर्मा नामक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तेथील राज्यकर्त्यांवर केलेले आरोपही धक्कादायक आहेत. त्यावर काय कारवाई झाली? अशी सवाल आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात उपस्थित करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वतःला वाघ म्हणवणारे ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचं मांजर झालेत – भाजप
- सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार; अमित शहांची बंगालमध्ये घोषणा
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी महिना अखेरीस तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद
- इंग्रजी शिकविण्याच्या मुद्द्यावरून शशी शरूर यांचा पारा चढला
- धनंजय मुंडे यांच्या इशार्यानंतर प्रशासन लागले कामाला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

