मुंबई : एकाबाजूला देशात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला असतानाच देशात पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी या राज्यांच्या निवडणुकांसह अनेक लोकसभा व विधानसभांच्या पोटनिवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये प्रमुख चुरस निर्माण झाली असून या राज्याच्या निकालांना अधिक महत्व प्राप्त झालं आहे.
सुरुवातीच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेसने आघाडी घेतली असली तरी भाजपने देखील जोरदार मुसंडी मारली आहे. मागील निवडणुकांमध्ये भाजपला केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी पश्चिम बंगाल काबीज करण्यासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेत्यांची फौज उतरवली होती.
दरम्यान, या सर्व निकालांवर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. ‘तमिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता कुठेही सत्ताबदल होणार नाही, असं भाकीत संजय राऊत यांनी केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना पराभूत करण्यासाठी भारतानं जंगजंग पछाडलं. पण बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही,’ असं राऊत म्हणाले आहेत.
यासोबतच, ‘भाजपच्या जागा वाढणार आहेत. त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. देशात कोरोनाचं संकट असतानाही नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री बंगालमध्ये तळ ठोकून होते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्ता राखतील. भाजपच्या जागा वाढणार असल्यानं त्याचा फटका तृणमूलला बसेल. गेल्या वेळेच्या तुलनेत त्यांच्या जागा कमी होतील. पण काठावरचं का होईना, त्यांना बहुमत मिळेल.’ असा विश्वास राऊत यांनी व्यक्त करतानाच केरळमध्ये डावे, तर आसाममध्ये भाजप सत्ता राखेल. पण तमिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये सत्ताबदल होईल, असा अंदाज वर्तवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- #पंढरपूरनिवडणूक : आवताडे आणि भालकेंमध्ये काटे की टक्कर; तिसऱ्या फेरीत कोणाची आघाडी घ्या जाणून !
- फडणवीसांबाबत आक्षेपार्ह विधान; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाच जणांविरोधात तक्रार दाखल !
- दिलासा: आता प्राप्तिकर भरण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदत
- ‘पुनावालांच्या आरोपांवर खरं-खोटं तपासण्याची गरज’, जितेंद्र आव्हाडांची मागणी
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण बैठक


