मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याचा प्रयत्न काही पोलीस अधिकाऱ्यांनीच केला होता, असा धक्कादायक खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याचं वृत्त एका खाजगी वृत्तवाहिनीने प्रसरीत केलं आणि राज्यात एकच खळबळ उडाली. मुलाखतीमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केल्याचे ‘त्या’ वाहिनीने दावा केला होता.
मात्र यानंतर ‘राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, असं काहीही मी बोललेलो नाही. याबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे,’ माझी तोंडी चुकीचे वक्तव्य घालण्यात आले आहे. असं स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल पुण्यात केलं. तर आज सामनाच्या अग्रलेखातून देखील या घडामोडींवरून सरकार पडण्याचा मनसुबा असलेल्या विरोधकांना लक्ष्य केलं आहे.
सामना अग्रलेख-
काही सहानुभूतीदार अधिकारी मंडळाच्या भरवशावर कोणी सरकार पाडण्याचे मनसुबे पाहत असतील तर ते वेडगळपणाचे ठरेल. यातील काही अधिकारी आजही उच्चपदी विराजमान आहेत. ठाकरे सरकार येऊ नये म्हणून उघड प्रयत्न करूनही आपले कोणी काय वाकडे केले या थाटात ते वावरत असतात.
सरकारला धोका असतो तो याच प्रवृत्तीपासून. सरकार पाडणे म्हणजे काय असते? सरकारसंदर्भातले काही विषय गुप्तपणे विरोधकांकडे पोहोचवणे व सरकारच्या विरोधात प्रशासकीय यंत्रणेत अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे. अशा प्रवृत्तींवर निगराणी ठेवणे हे गृहखात्याचे काम आहे. ते त्यांनी चोख पार पाडले तर सरकारचे भवितव्य उत्तम आहे. सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न कोणताही अधिकारी करीत नाही. ते फक्त मनसुबेच ठरतात, पण अस्तनीत निखारे हे असतातच. सावधगिरी बाळगावीच लागेल!
भारतीय जनता पक्षाचे लोक महाराष्ट्र सरकार पाडण्याचा प्रयत्न काल करत होते. आज-उद्याही करतील. हे सगळे ठीक, पण राज्यातील काही बडे पोलीस अधिकारी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत होते किंवा आहेत असे एक विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तोंडी घातले गेले. त्यावरून खळबळ उडाली. आता गृहमंत्र्यांनी जाहीर केले की, मी अशा प्रकारचे काही विधान केलेच नव्हते. म्हणजे पोलीस अधिकारी सरकार पाडणार या विधानाचा गृहमंत्र्यांनी साफ इन्कार केला आहे.
राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्य़ांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न वेळीच हाणून पाडला, असे गृहमंत्री बोललेच नव्हते. मग त्यांच्या तोंडी असे विधान टाकण्याचे धाडस केले कोणी? ज्या कोणी हे धाडस केले तेच लोक सरकारला कमजोर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रशासन हे निवडून येणाऱ्य़ा लोकनियुक्त सरकारचे असते. एखाद्या राजकीय पक्षाचे नसते. सरकार बदलताच भलेभले अधिकारी टोप्या फिरवतात.
उगवत्या सरकारला त्यांना नमस्कार करावाच लागतो. हे फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात सर्व स्तरांवर सुरू असते. महाराष्ट्रातील प्रशासन हे देशात उत्तम आहे. ज्याला आपण ‘प्रोफेशनल’ म्हणतो अशा पद्धतीचा अधिकारी वर्ग महाराष्ट्राला लाभला आहे. सरकार बदलण्याची व पाडण्याची क्षमता त्यांच्यात नाही. राज्याची ती परंपरा नाही.
महत्वाच्या बातम्या
- अतिवृष्टीमुळे पिकं वाहून गेले, अशोक चव्हाण पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
- मराठा आरक्षण स्थगितीविरोधात आज राज्यातील पहिला जिल्हा बंद, सरकारचं घालणार श्राद्ध
- मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन, मनसेसैनिकांनी लोकलने प्रवास केलाच…
- राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी सभापती व्यंकय्या नायडूंकडून आठ सदस्यांवर निलंबनाची कारवाई
- भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली, 25 कुटुंबातील 70 ते 80 नागरिक अडकल्याची भीती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

