मुंबई : भाजपासोबतची युती तुटल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर खूप मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आतापासूनच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे. दरम्यान एका बाजूला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना देखील अमराठी मतांसाठी जोरदारपणे तयारीला लागली आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेकडून यासाठी गुजरातींसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला ही अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कधीकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजपने शिवसेनेच्या या बदलत्या भूमिकेवर खोचक टीकास्त्र सोडलं आहे. आता, भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ‘शिवसेनेची भूमिका परप्रांतीयांच्याबाबत अनेकवेळा समोर आलेली आहे. आता सत्तेत आल्यावर त्यांची भूमिका आपण पाहत आहोत. भविष्यात ते मुस्लिम समाजाचादेखील मेळावा घेऊ शकतात. कारण त्यांची बिचाऱ्यांची भूमिका बदलली. हा संगतीचा परिणाम आहे. कदाचित अन्य पक्षाच्या सोबत राहिल्यावर त्यांची भूमिका बदलली असेल’, असा खोचक टोला दानवेंनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना मिळणार ‘हि’ सुविधा
- संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणाऱ्या थोरातांच्या घरी मनसे पाठवणार 10,000 पोस्टकार्ड
- ममता बॅनर्जींची डोकेदुखी वाढली; लक्ष्मी रतन शुक्ला यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा
- सीरम विरुद्ध भारत बायोटेक : अखेर कोरोना लस उत्पादक कंपन्यांमधील वादावर पडदा
- संजय राऊत भाजपला सुरुंग लावण्याच्या तयारीत; राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा


