पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यात संबंध असल्याचा आरोप केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पुण्यातील सभेत ५ जूनच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यात आपल्याला अडकवण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांनी आपला दौरा पुढे ढकलला. त्यानंतर मनसेने शरद पवार आणि राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा फोटो व्हायरल केला होता. त्यामुळे राज ठाकरेंविरोधात शरद पवारांनी सापळा रचल्याचा आरोप करण्यात आला होता. या सर्व प्रकरणावर शरद पवार यांनी आज पुण्यात भाष्य केले आहे.
शरद पवार म्हणाले, ” ब्रिजभूषण कोणी मॅनेज करेल अशी व्यक्ती नाही. ब्रिजभूषण यांनी मांडलेली मते त्यांची वैयक्तीक मते होती. त्यांना कोणी मॅनेज केले हे डोक्यातून काढून टाका.”
राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत अयोध्येला न येण्याचे कारण सांगितले होते. ते म्हणाले होते की, ते आणि त्यांचे कार्यकर्ते अयोध्येला गेले तर त्यांना कोणत्यातरी कटाला बळी पडावे लागू शकते. त्यांच्या कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवले जाईल, अशी भीतीही व्यक्त केली जात होती. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांना कोणत्याही अडचणीत न टाकण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला होता.
उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापूर्वी माफी मागण्यास सांगितले होते. राज ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर अयोध्येच्या भूमीवर पाय ठेवू देणार नाही, असे ते म्हणाले होते. त्यामुळे हा ट्रप असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता. यावेळी राज ठाकरेंनी कोणाची नावे घेतली नव्हती. मात्र सभेनंतर मनसे नेत्यांनी शरद पवार व ब्रिजभूषण यांचे जुने फोटो बाहेर काढत हा पवारांचा कट असल्याचा आरोप केला होता.
महत्वाच्या बातम्या :


