मुंबई : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात देखील त्यांनी महाराष्ट्रासाठी खास प्रयत्न करून संकटात मोठी मदत केली होती. तर, त्यांच्या रस्ते बांधणीच्या विक्रमी नोंदीमुळे ते आता ‘रोडकरी’ म्हणून ओळखले जात आहेत. फारसे कधी न संतपणारे गडकरी आता मात्र शिवसेनेच्या दहशत पसरवणाऱ्या कारवायांमुळे चांगलेच संतापले आहेत.
इतकंच नाही तर त्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून कारवाईचा इशारा देखील दिला आहे. ‘महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरु असताना शिवसेनेचे कार्यकर्ते कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून अधिकारी, कर्मचारी-कामगारांमध्ये दहशत निर्माण करीत काम बंद पाडत आहेत. हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्यासंदर्भात आमच्या मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल,’ असा स्पष्ट इशारा नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना लिहिलेल्या पत्रातून दिला आहे.
गडकरी यांनी पत्रात नेमकं काय म्हणलंय ?
गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय रस्ते विकासाची कामं रखडली आहेत. मी माहिती घेतल्यावर स्थानिक शिवसेना प्रतिनिधींनी ही काम थांबवली असल्याचं मला कळलं, असंही गडकरी यांनी पत्रात म्हटलं आहे. तसंच स्थानिक नेत्यांचे जर असेच प्रकार सुरु राहिले तर महाराष्ट्रात रस्त्यांच्या कामांना नविन मंजुरी देण्याबाबत परत विचार करावा लागेल.

विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी आणि कंत्राटदार हैराण झाले आहेत. मागण्या पुर्ण न केल्याने काम बंद पाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, असं विधान करतानाच त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘ही कामे ‘डिस्कोप’ केली तर आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरू. तसे झाले तर महाराष्ट्राचा नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण कृपया यातून मार्ग काढावा,’ असं देखील गडकरी यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

नितीन गडकरी यांनी या पत्रात मांडलेले मुद्दे –
१. अकोला आणि नांदेड या २०२ किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजेसमध्ये सुरु आहेत. गेडशी ते वाशिम या पॅकेज-२ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी १२ किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, प्रस्तुत बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबवले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.
२. या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गेच काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे.
३. पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरु केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करुन कंत्राटदाराचे अधिकारी-कर्मचारी-कामगार यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.
४. उपरोक्त बाबी लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरु ठेवावीत की कसे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल.
५. हे असंच चालत राहिलं तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामं मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. यामुळे महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल.
ही कामे डिस्कोप केली तरी आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरु. तसे झाले तर महाराष्ट्रातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण यातून कृपया मार्ग काढावा, अशी माझी विनंती आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संसदीय मर्यादाभंग! खासदार बेफाम का होतात, याची कारणे अष्टप्रधानांनी शोधावी- संजय राऊत
- मुंबई महापालिकेचा गणेशोत्सव मंडळांना दिलासा !
- इंग्लंडचा कर्णधार जो रुटने गाठला मैलाचा टप्पा, द वॉल द्रविडला टाकले मागे
- ‘मोदी सरकारच्या इशाऱ्यावर ट्विटरने आमचे अकाऊंट लॉक केले, मात्र त्यांना आम्ही भीक घालत नाही’
- ‘जसं 370 कलम हटवलं, तसंच…’; संजय राऊत यांची थेट गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

