🕒 1 min read
नाशिक : केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने 20 एप्रिल पासून लॉकडाऊनबाबत नवीन नियमावली लागू केली आहे, त्यानुसार मालवाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना यापुढे मालाची ने-आण करण्याकरीता मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना यापुढे नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी प्राप्त करण्याची गरज नाही. तसेच काही मालवाहतुक करणाऱ्यांना आवश्यकता भासल्यास त्यांनी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल केल्यास त्यांना ऑनलाईन ई-पास ची सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती, नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
कळसकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे की, कोरोना ( कोवीड – 19 ) विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने 24 मार्च पासून संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लागु केलेले आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी गरजेच्या वाहनांना अत्यावश्यक मालाची वाहतुक करण्यासाठी शासन आदेशानुसार नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विशेष पास जारी करण्यात येत होते. या कार्यालयामार्फत अत्यावश्यक सेवेची मालवाहतुक करणाऱ्या 4 हजार 363 वाहनांना आजपर्यंत ई-पासेस देण्यात आले आहेत .
परंतु , केंद्र शासनाने जारी केलेल्या नवीन निर्देशानुसार शासनाने 20 एप्रिल 2020 पासून लॉकडाऊनबाबत नवीन नियमावली जारी केलेली आहे. त्यानुसार मालवाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना यापुढे मालाची ने -आण करण्याकरीता परवानगी दिलेली आहे . त्यामुळे मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना यापुढे नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी प्राप्त करण्याची गरज नाही. तथापी, काही अर्जदारांना ई-पासची आवश्यकता भासल्यास त्यांनी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल केल्यास, अर्जदारांना ऑनलाईन ई-पास देण्यात येत आहेत. वाहनधारकांनी या कार्यालयाच्या ईमेल आयडीवर पाससाठी अर्ज करणे टाळावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, भरत कळसकर यांनी केले आहे.


