🕒 1 min read
औरंगाबाद:राज्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाने शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना परत ‘ऑनलाइन’च्या माध्यमातून शिक्षण घ्यावे लागत आहे. या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण(Satish Chavan) यांनी रविवारी (दि.१६) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
आ.सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटेल आहे की, सरकारने एकीकडे मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृह आदी ठिकाणे ५० टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याची मुभा दिली असताना शाळा, महाविद्यालये सरसकट बंद का? असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. शाळा बंद असल्याने मुले शिक्षणापासून तर दुरावली आहेतच पण त्याच बरोबर त्यांच्या लेखन, वाचन आणि ज्ञानग्रहण क्षमतेवर देखील विपरित परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यात आमची मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ ही दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात ग्रामीण भागातील अनेक मुले-मुली शिक्षण घेतात. मात्र मागील ‘लॉकडाऊन’मुळे ही मुले-मुली गावी गेल्याने त्यांच्या शिक्षणात खंड पडला.
अनेक मुले शेतात काम करत आहेत तर अनेक मुलींचे बाल वयातच विवाह लावण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. एकीकडे बाल विवाह रोखण्यासाठी शासकीय पातळीवर विविध उपाय योजना करायच्या अन् दुसरीकडे कोविड बाधितांची संख्या वाढत असल्याचे कारण सांगून विद्यार्थ्यांचेच वसतीगृह यासाठी ताब्यात घ्यायचे. याचा देखील शासनाने आता गांभीर्यपूर्वक विचार करायला हवा. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता यापुढे किमान शाळा, महाविद्यालयांच्या इमारती तसेच वसतिगृह तरी कोविड बाधितांसाठी ताब्यात घेण्यात येऊ नयेत असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-
किरण मानेंची सहकलाकारांशी चांगलीच वागणूक, सेटवरील महिला कलाकारांचा पाठिंबा
-
“भाजप राजकीय फायद्यासाठी जातीय चौकटीत बांधू पाहतेय”, संजय राऊतांची टीका
-
“इतर कलाकारांना त्यांनी त्रास दिला, योग्य वेळी…”; किरण मानेंच्या विरोधात मनसे मैदानात

