पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ८ तारखेला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी देखील या कृषी कायद्यांवरून आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्यात या कायद्याविरोधात आंदोलन उभारलं असून केंद्र सरकारला इशारा देखील दिला आहे. ‘केंद्र शासनाने लागू केलेले तीन कृषीविषयक कायदे म्हणजे अदानी-अंबानी अशा खाजगी उद्योजकांना पायघड्याच आहेत,’ असा आरोप त्यांनी आज केला आहे.
शेतमाल उत्पादकापासून ते ग्राहकांपर्यंत सर्वांनाच हे कायदे घातक असून, याविरोधात उद्या (८ डिसेंबर) भारत बंद आंदोलनात बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवस तरी सर्व घटकांनी आपले व्यवहार बंद ठेवावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अखिल भारतीय किसान संघटनेच्यावतीने ८ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते.
ते म्हणाले, कृषी कायदे (विधेयके) यांना शेतकऱ्यांचा विरोध का आहे हे समजून घेण्याऐवजी केंद्र सरकार या विरोधातील आंदोलनाला जातीय व प्रांतीय रंग देत आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद असल्याने देशातील शेतकरी दिल्लीपर्यंत जाऊ शकले नाहीत, तर जे शेतकरी स्वत:च्या गाड्यांनी गेले त्याला जागोजागी अडवून दडपशाहीचा वापर करून पुन्हा पाठविण्यात आले.मात्र केंद्र सरकारची ही दडपशाही योग्य नसून आणीबाणीच्यावेळी जसा जनउद्रेक झाला तसा आता शेतकऱ्यांचा होईल व याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील असा इशाराही त्यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : भारतातील कोरोना लसीकरणाचा मुहूर्त ठरला? केंद्र सरकारची तयारी सुरु!
- नर्सेसच्या रिक्त जागा तातडीने भरल्या जातील, राजेश टोपेंचे आश्वासन
- टाटा मोटर्सच्या गाड्यांवर मिळणार चक्क ‘एवढी’ सूट, हॅरिअर, नेक्सॉनवरही जबरदस्त ऑफर !
- ‘भारत बंद’ला प्रतिसाद मिळणार नाही; रामदास आठवलेंचा दावा
- शेतकरी आंदोलन : उद्याच्या भारत बंद दरम्यान काय सुरू, काय राहणार बंद ?


