मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आणि महाराष्ट्रासह देशात एकच खळबळ माजली.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत तातडीची बैठक बोलावली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना तातडीने दिल्लीत बोलावून घेण्यात आले आहे. या बैठकीत परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहमंत्री बदलण्याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी ही महत्वाची बैठक सुरु झालेली आहे. साधारणत सात वाजल्यापासून ही बैठक सुरु झालेली आहे. थोड्याच वेळापूर्वी शिवसेनचे नेते संजय राऊत हे पवारांच्या भेटीला आलेले होते. आणि त्यांच्यासोबत बराच काळ चर्चा केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत पवारांची ही बैठक सुरु झालेली आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख हे दिल्लीमध्ये येऊन पवारांना भेटले होते. त्याचवेळी देशमुखांच्या राजीनाम्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगत होती. परंतु पवारांना भेटल्यानंतर या सर्व चर्चेला पूर्णविराम लागला होता.
परंतु काल परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री अनिल देशमुख चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत. त्यामुळे आता पवार यांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या बैठकीला महत्व प्राप्त झालेले आहे. नेमका आता या बैठकीत पवार कोणता निर्णय घेणार? याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना लस न घेताच मिळालं लस घेतल्याचं प्रमाणपत्र; प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड
- भाजपाच्या षडयंत्राला व गोदी मीडियाच्या दबावाला सरकारने बळी पडू नये; काँग्रेस नेत्याची टीका
- मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तिढा सुटला ! ; ‘त्या’ दोघांना ATS कडून अटक
- शिक्षकांना विमा सुरक्षा कवच देण्याची शिक्षक समितीची मागणी
- सचिन वाझे राष्ट्रवादीसाठी काम करत होते की, सरकारसाठी? केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

