नाशिक : आमदार-खासदारांशी ओळख असल्याचे सांगत, त्यांचे आवाज काढत लोकांची फसवणूक करण्याची अनेक प्रकरणे बाहेर येतात. पण थेट आमदार असल्याचे भासवत लोकांना फसवणाऱ्या तोतया आमदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महागड्या चारचाकी वाहनावर राजमुद्रा, आमदारांना असलेला प्रवेशपास अशी अनेक बनावट कागदपत्रे जमा करून त्याने लोकांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहीतीप्रमाणे सदर कारवाई 29 ऑगस्टच्या मध्यरात्री एक वाजता करण्यात आली. वणी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शिंदवड गावाच्या त्रिफुलीवर करण्यात आलेल्या कारवाईत राहुल दिलीपराव आहेर (32) रा.शिंदाड ता. दिंडोरी जि. नाशिक यास अटक करण्यात आली आहे. राहुल आहेर या तरुणाच्या ताब्यात मिळालेल्या सिल्व्हर रंगाच्या इनोव्हा गाडीच्या (एमएच 15 डीएम 4175) पुढील व मागील बाजूस असलेल्या काचेवर गोलाकार हिरव्या व सिल्व्हर रंगाचे सत्यमेव जयते लिहिलेल्या व अशोकस्तंभाच्या चित्राचे स्टीकर लावलेले आढळून आले. याशिवाय केवळ अधिवेशन कालावधीसाठी वाहन प्रवेश पास नावाच्या लोगोचे देखील स्टीकर आढळून आले.
सदर वाहन शासकीय असल्याचे भासवण्याचा प्रयत्न असल्याचे एकंदरीत तपासणीत आढळून आले. तसेच नरहरी झिरवाळ, विधानसभा सदस्य यांच्या नावाचे राजमुद्रा असलेले सही असलेले कोरे नोटपॅड देखील त्याच्याकडे आढळून आले. याशिवाय माजी आमदार अनिल कदम यांचे विधानसभा सदस्यांचे ओळखपत्र, त्यांचा फोटो असलेले व स्वतःचे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय प्रवेश पत्रिका पोलिस पथकाला आढळून आले.

या सर्व कागदपत्रांचा व वाहनाचा गैरवापर करुन विधानभवनात आमदार, शिक्षणमंत्री व इतर मंत्र्यांसोबत आपले जवळचे संबंध असल्याचे भासवण्याचा राहुल आहेर याचा प्रयत्न असल्याचे दिसून आले. लोकांच्या शाळा अनुदानीत करुन देण्याच्या भुलथापा देत त्यांच्याकडून दिड लाख रुपये घेत खोटे कागदपत्र मिळून आल्यामुळे राहुल आहेर याच्याविरुद्ध वणी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात तोतया राहुल आहेर वय ३२ वर्षे रा. शिंदवड ता. दिंडोरी जि. नाशिक यांना अटक करण्यात आलेली असून दिनांक ०३/०९/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपुत हे करीत आहेत. सदर कामगिरी मध्ये सहापोउपनि गुरळे, पाटील, पोहवा वराडे, सानप, जगताप, खराटे, मासुळे, बहिरम सामिल होते.
दरम्यान, या राहुल आहेरचे अनेक नेत्यांच्या सोबतचे फोटोज सध्या व्हायरल होत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आदी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सोबतच्या फोटोज सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागले असून आता याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. आहेर याने काही लोकांची फसवणूक केली असल्याचा देखील आरोप होत असून याबाबत पोलिस तपास करणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’, मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सवाल
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- ‘मंदिरे उघडलीच पाहिजे अन्यथा..’, राज ठाकरेंचा इशारा

