तळेगाव दाभाडे : पक्षाशी एकनिष्ठ राहूनही पक्षाने उमेदवारी नाकारल्याने मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब नेवाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हजारो कार्यकर्त्यांचा मेळावा घेत नेवाळे यांनी बुधवारी राजीनामा देत पक्षावर असलेली नाराजी बोलून दाखवली.
बाळासाहेब नेवाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक आणि निष्ठावान नेत्यांपैकी एक आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल अशी आशा नेवाळे यांना होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे बंडखोर उमेदवार सुनील शेळके यांना उमेदवारी देत नेवाळे यांचा हिरमोड केला. यावर नाराज होत नेवाळे यांनी भव्य मेळावा घेत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
यावेळी नेवाळे म्हणाले की, गेल्या 25 वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून देखील दोनदा निवडणुकीतून डावले गेले. मात्र भाजपच्या बंडखोराला उमेदवारी दिली. उमेदवारी देताना साधे विचारण्यात देखील आले नाही. एक फोन सुद्धा पक्षश्रेष्ठींचा आला नाही. त्यामुळे हा माझ्या एकट्याचा अपमान नसून माझ्या ग्रामीण भागाचाही अपमान आहे, असे म्हणत नेवाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली.
बाळासाहेब नेवाळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने नेवाळे समर्थक या निवडणुकीत कोणाला समर्थ देणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहिला मिळणार आहे. यावेळी मावळ विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राज्यमंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात भेगडे यांचेचं सहकारी सुनील शेळके यांना कॉंग्रेस आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवार तोडीसतोड असल्याने मावळात हायव्होल्टेज लढत पाहिला मिळणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
